आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pregnant Woman\'s Womb Dead Because Of Doctor Allegation From Victim

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्भवतीची बारा तास हेळसांड, अखेर पोटचा गोळा गमावला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- प्रसूतीवेदना जाणवू लागल्यानंतर एका महिलेला उपचारांसाठी पहाटे चारपासून आरोग्य उपकेंद्र, दोन प्राथमिक आरोग्य केंदे्र ते उपजिल्हा रुग्णालय असा बारा तास जीवघेणा प्रवास करावा लागला. शेवटी वेळीच उपचार न झाल्याने या मातेला नऊ महिने सांभाळलेला पोटचा गोळा गमावण्याची वेळ आली. वैजापूर तालुक्यातील वाकला येथे शनिवारी हा दुर्दैवी प्रकार घडला.

वाकला येथील सुनंदा अंकुश जाधव हिला शनिवारी पहाटे नातेवाइकांनी गावातच उपकेंद्रात प्रसूतीसाठी दाखल केले. मात्र येथील महिला कर्मचा-यांनी तिला लोणी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी धावपळ करून सुनंदाला तत्काळ लोणीतील आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथे डॉक्टर उपस्थित नव्हते. तेथील कर्मचा-यांनी सकाळी नऊपर्यंत प्रसूती होईल, असे सांगितले. मात्र, ती प्रसूत झाली नाही. त्यामुळे लोणीतील आरोग्य कर्मचा-यांनी गर्भवतीस शिऊरला हलवण्याचा सल्ला दिला.

नातेवाइकांनी पुन्हा धावपळ करून गर्भवतीला शिऊरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. येथेही डॉक्टर नव्हते. कर्मचा-यांनी तिला वैजापूरला हलवण्यास सांगितले. यादरम्यान गर्भवतीला असह्य वेदना होत होत्या. वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली तेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोके सुरू होते. त्यामुळे सीझर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.त्यासाठी पाच ते सहा हजार रुपये तयार ठेवा, असेही नातेवाईकांना सांगण्यात आले. महिलेच्या वडिलांनी पैशांची जमवाजमव सुरू केली. एवढ्यावर या गर्भवतीच्या मागे लागलेले दुष्टचक्र थांबले नाही. वैजापूर आरोग्य केंद्रात भूलतज्ज्ञच नव्हता. आता तिला औरंगाबादला हलवावे लागणार होते.

उपसंचालकांकडे तक्रारीनंतर झाले सीझर
दरम्यान, या प्रकाराची माहिती शिवसेनेच्या पदाधिका-यांना देण्यात आली तेव्हा तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, प्रमोद कुलकर्णी रुग्णालायत आले. त्यांनी आरोग्य उपसंचालकांकडे डॉक्टरांची तक्रार केली. त्यानंतर धावपळ सुरू झाली. अखेर चार वाजता महिलेचे सीझर केले. मुलगा झाला, परंतु तोवर या नवजात बालकाचे प्राणेत्क्रमण झाले होते. वाकला, लोणी, शिऊर, वैजापूर असा पहाटे चार ते दुपारी चारपर्यंत 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करून हाती मृत बालक लागल्यामुळे नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.

डॉक्टरांविरुद्ध फिर्याद देणार
मुलीच्या प्रसूतीदरम्यान लोणी, शिऊर, वैजापूर येथील डॉक्टरांनी 14 तास उपचाराच्या नावाखाली आम्हाला फिरवले. योग्य उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यू झाला. या बेजबाबदार डॉक्टरांविरुद्ध मी फिर्याद देणार आहे.
- साहेबराव बडक, महिलेचे वडील

वैद्यकीय सेवा बारगळली
उपजिल्हा रुग्ण समितीचे सल्लागार प्रा. रमेश बोरनारे यांनी वैद्यकीय सेवतील बेपर्वाई वाढल्याचे हे द्योतक आहे, असे म्हटले आहे. रुग्णसेवेपेक्षा पैसे कमावण्याकडे डॉक्टरांचा कल आहे. याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

12 डॉक्टर गैरहजर
प्रसूतीत अर्भक दगावल्यानंतर शिवसेना पदाधिका-यांनी तहसीलदारांकडे तक्रार करून रुग्णालयातील डॉक्टरांची उपस्थिती तपासण्याची मागणी केली. त्यानुसार तहसीलदार महादेव किरवले यांनी रुग्णालयाचा पंचनामा केला. या वेळी 12 डॉक्टर गैरहजर असल्याचे आढळून आले.