आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना गुंगारा देऊन आरोपीचे कोठडीतून पलायन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - पुणे येथील सराईत गुन्हेगार राहुल थोरात हा तुळजापूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा गुन्हेगार आठवड्यात दुसर्‍यांदा पसार झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत.

तुळजापूरसह पुणे येथील दोन घरफोड्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार राहुल ऊर्फ शेंड्या सीताराम थोरात (२४, रा. मांगवडगाव, ता. केज, जि. बीड, हल्ली मुक्काम काळेचा वाडा, वाघोली, घोर, ता. हवेली, जि. पुणे) तुळजापूर पोलिसांच्या कोठडीत असताना गुरुवारी (दि. २५) पहाटे ५.३० च्या सुमारास शौचास जाण्याच्या बहाण्याने कोठडीतून बाहेर आला. दरम्यान, सर्वत्र सामसूम असल्याचा फायदा घेत सोबतच्या पोलिस हवालदार जोगदंड यांना धक्का देऊन त्याने पोलिस आवारातून धूम ठोकली.

दरम्यान, हाच आरोपी राहुल थोरात याने गेल्या गुरुवारी (दि. १८) तालुक्यातील काक्रंबा येथील भांडणाच्या प्रकरणात संशयित म्हणून चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले असताना सकाळी ११.३० च्या सुमारास पोलिस ठाण्यातून धूम ठोकली होती. या वेळी विशेष पोलिस पथकाच्या अथक प्रयत्नानंतर घाटशीळच्या पायथ्याला सोलापूर-बार्शी टी पॉइंटवरील उसाच्या फडातून शिताफीने त्याला पकडले होते. परंतु आज पुन्हा हा कैदी पळून गेला.

आराेपीचे नातलग गायब
आरोपी राहुल ऊर्फ शेंड्या थोरात याचे नातेवाइक पोलिस ठाण्याच्या आवारात गेल्या आठ दिवसांपासून ठाण मांडून होते. तर आरोपीची पांढर्‍या रंगाची नॅनो कार (एमएच १४ सीएस ४७१२) पोलिसांनी ताब्यात घेतली होती. ती बुधवारी (दि. २४) पोलिसांनी कुटुंबीयांकडे दिल्यानंतर कारचा चालक व कुटुंबीय घटनेनंतर गायब आहेत.
बातम्या आणखी आहेत...