आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुल्या कारागृहातील ३६६ कैद्यांचे उपोषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - येथील खुल्या कारागृहातील ४१५ पैकी ३६६ कैद्यांच्या जन्मठेपेचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, मुक्ततेसंदर्भात शासनाचे आदेश न आल्याने त्यांची सुटका करण्यात आली नाही. अशा कैद्यांना तत्काळ मुक्त करावे या मागणीसाठी या ३६६ कैद्यांनी शुक्रवारपासून चहा, नाश्ता, जेवण घेण्यास नकार दिला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या कैद्यांनी कारागृह अधीक्षकांना दिला आहे. दरम्यान, कारागृह अधीक्षकांनी अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांना पत्र पाठवून या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. पैठण येथील खुल्या कारागृहात ४१५ कैदी आहेत.

त्यापैकी ३६६ कैद्यांची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण झाली आहे. मात्र, चार ते पाच महिन्यांपासून त्यांना सोडण्यात आले नाही. सर्वौच्च न्यायालयाने कैद्यांच्या मुदतपूर्व सुटकेला स्थगिती आदेश दिले आहेत. ती स्थगिती उठवावी, अशी मागणी करत कैद्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. याबाबत कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी वरिष्ठांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, आपल्या विविध मागण्यांसाठी कैद्यांनी उपोषण सुरू केले आहे.

पुनर्वसनही करा
उपोषण करणार्‍या कैद्यांनी कारागृह महानिरीक्षकांना निवेदन पाठवले आहे. त्यात जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करणार्‍या कैद्यांच्या पूर्नवरसनासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. याबाबत बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेऊ द्यावी, अशी विनंतीही कैद्यांनी केली आहे.

पूर्वकल्पना नाही
शुक्रवारी या कैद्यांनी अचानक आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे कारागृहातील शेतीची कामे खोळंबली, वारंवार समजावूनही कैदी मागण्यांवर ठाम होते, असे कारागृह अधीक्षक राजकुमार माळी यांनी सांगितले.