बीड - ज्या लोकांनी बाबांवर जिवापाड प्रेम केले त्या जनतेला आम्ही दूर जाऊ देणार नाहीत. त्यांच्या सुख-दु:खात आम्ही सर्व शक्तीनिशी पाठीशी राहू, अशी भावनिक साद दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी घातली.
परळी विधानसभा मतदारसंघातील सिरसाळा सर्कलचा सोमवारी डॉ. प्रितम मुंडे यांनी दौरा केला. डिग्रस, पोहनेर, कासारवाडी, रामनगरतांडा, घनाळतांडा, हिवरा, गोवर्धन पिंप्री, या गावात जावून भेटी देत संवाद साधला.
बाबांच्या अवेळी जाण्याने आमच्या कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली व आम्ही पोरके झालोत. अशी परिस्थीतीत राज्यातील सर्वसामान्य जनतेने आम्हाला धीर दिला. प्रेरणा दिली. त्यामुळे आमदार पंकजा मुंडे दु:खात संघर्ष यात्रा काढु शकल्या. सामान्य जनतेला आधार व धीर देण्यासाठी ताईं संघर्ष यात्रा काढु शकल्या. राज्यात या यात्रेला प्रतिसाद मिळाला. सामान्य माणुस उपाशी राहून यात्रेत सहभागी झाला. लोकांनी बाबांवर जीवापाड प्रेम केले. पंकजाताई मुंडे यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे त्या सध्या राज्यात फिरत असून आम्ही दोघी बहिणी आमच्या परीने त्यांना मदत करत आहोत.
(छायाचित्र : डॉ. प्रीतम मुंडे यांचे सिरसाळा सर्कलमध्ये महिलांनी औक्षण केले.)