आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही जगायचं कसं? कारखान्यांच्या कर्मचा-यांना दिले नारळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला वेगाने अवकळा येत आहे. मराठवाड्यातील सर्वात जुन्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी पगार होत नसल्याने शुक्रवारपासून (३ जुलै) काम सोडून दिले असून दुसऱ्या सहकारी संस्थेतील म्हणजे तुळजाभवानी दूध संघातील सर्व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एकाच दिवशी दोन मोठ्या सहकारी संस्थांना अवकळा आली आहे. यापुढे या दोन्ही संस्था कामगारांव्यतिरिक्त बकाल दिसू लागतील. दुर्दैवाची बाब म्हणजे कामगारांवर बिकट वेळ आली असली तरी एकही राजकीय पक्ष, संघटना पुढे आलेली नाही. त्यामुळे पगाराअभावी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अवसान गळाले आहे.

कर्मचारी १९८२ मध्ये कामाला लागले, तेव्हा १० रुपये पगार होता. संस्थेच्या हितासाठी दिवस-रात्र कष्ट केले. ३० वर्षांनंतर हातात मिळाली दोन पानांची नोटीस. ३ वर्षांपासून थकलेला पगार नाही की भविष्याची दिशा नाही. ३० वर्षांपासून जेमतेम ४ ते ५ हजार रुपयांवर काम करणाऱ्या तुळजाभवानी दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी(४ जुलै) अवसायकांनी सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावल्या आणि कर्मचाऱ्यांच्या भावना दाटून आल्या. संघ बंद पडल्याने ४९ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली असून आता दूध संघाचा केवळ सांगाडा दिसणार आहे.

दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना १ जुलै रोजी सेवा खंडित करण्यात येणार असल्याची तोंडी सूचना अवसायकांनी दिली होती. त्यामुळे त्यांना कामावर येऊ नका, असेही संागण्यात आले होते. मात्र, अपेक्षेपोटी कर्मचारी शनिवारपर्यंत (४ जुलै) रोज कामावर येत होते. शनिवारी सकाळी अवसायकांनी सर्व कर्मचाऱ्यांना आपली सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे लेखी पत्र दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे अवसान गळून गेले. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना थकीत पगार देण्याविषयी आश्वासित करण्यात आले नाही. त्यामुळे पुढे काय होणार, तीन वर्षांपासून थकलेल्या पगाराचे काय, भविष्य निर्वाह निधीचे काय, असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत आहेत. काही कर्मचाऱ्यांची सेवा २० दिवस, एक-दोन वर्ष राहिलेली आहे. त्यामुळे आम्ही विनापगार काम करू, पुढच्या भवितव्यासाठी काही दिवस सेवा सुरू ठेवा, अशी मागणी अवसायकाकडे केली. मात्र अवसायकांनी कर्मचाऱ्यांची मागणी फेटाळून लावली.


"तेरणा'च्या कर्मचाऱ्यांनी सोडले कामकाज

ढोकी - थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या ढोकी (ता.उस्मानाबाद) येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारपासून कामकाज सोडून दिले. त्यामुळे आता तेरणा कारखान्यामध्ये सुरक्षा रक्षकही उरलेले नाहीत.

मराठवाड्यातील सर्वात जुन्या तेरणा कारखान्याचे गाळप २०१२ पासून बंद आहे. तसेच थकबाकीमुळे वीजपुरवठाही खंडित आहे. वीज, पाणी या मूलभूत सुविधा नसल्याने या भागात वास्तव्य करणारे कामगार त्रस्त आहेत. मात्र, आज ना उद्या चांगले दिवस येतील, या भाबड्या आशेवर जगणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा संयम शुक्रवारी संपला. कामावर उरलेल्या सुरक्षा रक्षकांनी काम सोडून दिले आहे. त्यामुळे कारखान्याची अवस्था बकाल झाली आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीने केले भांडवल : तेरणा कारखान्याचे कायम कर्मचारी पगारासाठी कारखानदारासोबत ३ वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. कधी अध्यक्षांच्या घरावर मोर्चा तर कधी काम बंद आंदोलनाचा मार्ग अवलंबला जात होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही कामगारांच्या विषयाचे वेळेनुसार भांडवल केले. मात्र मदतीला कोणीही आले नाही. अखेर पगार मिळत नसल्याने अन्यत्र कामाच्या शोधासाठी कामगार निघून गेले आहेत.

अशी आहे स्थिती
तेरणा कारखान्याकडे ४४० कायम कर्मचारी असून त्यांचा आॅक्टोबर २०१२ पासून पगार बंद आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाच्या(२००७) कार्यकाळातील २९ महिन्यांचा पगार थकला. त्यामुळे कामगार मोलमजुरीला जाऊन उदरनिर्वाह भागवत आहेत. तेरणा कारखान्यावर २०० कोटी कर्ज असून २०१२ पासून हंगाम बंद आहे. कारखान्यावर नियुक्त प्रशासकाला संचालक मंडळाने स्थगिती आणली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्त न्यायाधीशामार्फत कारखान्याच्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.