आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prof.Laxmikant Tamboli Write Autobiography, Kumar Ketkar Notice

प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी आत्मचरित्र लिहावे, कुमार केतकर यांची सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - लौकिकार्थाने महाराष्ट्र एक आहे, असे आपण जरी म्हणत असलो तरी मराठी साहित्यात महाराष्ट्राच्या सर्व भागाचे दर्शन घडत नाही. त्यासाठी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी आत्मचरित्र लिहून या भागालाही साहित्यात स्थान द्यावे, अशी मौलिक सूचना दै.‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी रविवारी केली.येथील कुसुम सभागृहात ज्येष्ठ कवी प्रा .लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डी. पी. सावंत होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर, डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, उपमहापौर आनंद चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
केतकर यांनी आपल्या भाषणात प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांचा व आपला कसा स्नेहबंध जुळला, याचा धावता आढावा घेऊन ग्रंथाली चळवळीच्या निमित्ताने हे संबंध कसे दृढ झाले याचे विवेचन केले. त्यासोबतच महाराष्ट्र जरी एक आहे असे आपण म्हणत असलो तरी त्यातही भौगोलिक, सांस्कृतिक कसे गट आहेत याचेही मार्मिक विवेचन केले. मराठवाडा, विदर्भात चांगल्या साहित्याची निर्मिती होते. पश्चिम महाराष्ट्रात साहित्य नव्हे तर संपत्ती निर्माण होते. या संपत्तीचा दबदबा मंत्रालयावर निर्माण होतो. त्यावर सांस्कृतिक दबाव निर्माण करण्याची जबाबदारी ओघानेच मराठवाड्यावर येते. प्रा. लक्ष्मीकांत तांबोळींच्या लेखनातून आतापर्यंत त्यांच्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग व व्यक्ती यांचे वर्णन आले आहे. तथापि त्यांनी आत्मचरित्र लिहावे. ज्यात आत्म हा भाग असणार नाही तर त्यात या भागाचेही सविस्तर वर्णन असेल. त्यामुळे मराठी साहित्यात या भागाचे प्रतिबिंब दिसेल. आतापर्यंत जी आत्मचरित्रे आली त्यात मुंबई, पुणे इकडचीच वर्णने आहेत. मराठवाडा, विदर्भाची अशी वर्णने साहित्यात दिसत नाहीत. प्रा. तांबोळी यांनी हे काम करावे. अर्थात त्यांनी सत्यपणाने आत्मचरित्र लिहिले तर ते अनेकांसाठी समाधानकारक असणार नाही, असेही केतकर म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांनी कविता कशी उगम पावते याचा आढावा घेतला. सत्य सांगणारे आणि कोणाच्याही मनात उद्वेग निर्माण न करणारे शब्द म्हणजे कविता अशी माझी धारणा आहे. आजच्या काळात बुद्धिमान मत्सरग्रस्त झाले आहेत, सत्ताधारी संशयाने पछाडले आहेत, अज्ञानी हताश झाले आहेत. अशा वातावरणात कविता कोठून येणार? ज्ञानोबा, तुकोबा यांचा वारसा घेऊन मी कवितेच्या प्रांतात आलो. त्यामुळे उपनिषदे, भगवद्गीता यामध्येही मला काव्य दिसते, असे सांगून प्रा. तांबोळी यांनी उपनिषदातील ऋचा व गीतेतील श्लोकांचे दाखले दिले.
आठवणींना उजाळा
डॉ.कोत्तापल्ले हे प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांचे देगलूर महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. आपल्या भाषणात त्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्या वेळी शिक्षक किती निष्ठेने काम करीत असत, विद्यार्थ्यांना कसे प्रोत्साहन देत याचे त्यांनी दिलखुलास वर्णन केले.