आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Protest Against Reservation Issue Of Dhangar Society

आंदोलन - धनगर समाजाचा आरक्षणासाठी ढोकीत रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढोकी - धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ढोकी (ता. उस्मानाबाद) येथील चौकात रविवारी (दि.3) भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जवळपास एक तास रास्ता रोको केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी.) आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात धनगर समाज एसटी आरक्षण कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रविवारी (दि.3) कळंब- लातूर- बार्शीकडे जाणा-या रस्त्यावरील ढोकी चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी अंकुश दाणे, भारत डोलारे, डॉ. गोविंद कोकाटे, आश्रुबा कोळेकर, अरुण डोलारे, अरुण कोकाटे, दौलत गाढवे आदींसह समाजबांधव उपस्थित होते. यावेळी धनगर समाजाला आरक्षण द्यावे, याबाबत घोषणाबाजी करण्यात आली.

चौथ्या दिवशीही उपोषण सुरू
उस्मानाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेल्या धनगर एसटी आरक्षण कृती समितीच्या आमरण उपोषणाचा रविवारी (दि.3) चौथा दिवस होता. शनिवारी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्यासह विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिका-यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. तसेच रविवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, राजाभाऊ शेरखाने, हरिभाऊ शेळके,भाजपच्या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक स्मिताताई वाघ, एकनाथ पवार, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पाटील यांनी धनगर समाजाच्या उपोषणस्थळाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला. दुधगावकर यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळणे, हे त्यांच्या हक्काचे असल्याचे सांगितले.

15 ऑगस्टची डेडलाइन
धनगर समाजाला मागील 60 वर्षांपासून शासनाने झुलवत ठेवले आहे. राज्यघटनेनुसार हक्काचे आरक्षण देण्यास विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे आघाडी शासनाने 15 ऑगस्टपूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा शासनाच्या विरोधात समाज मतदान करण्याचा निर्णय घेईल, असा इशारा देण्यात आला.

.. तर धनगर समाजही कुठल्याही टोकाला जाऊ शकतो
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिल्यास आदिवासी समाज कुठल्याही टोकाला जाऊ शकतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केले आहे. मुख्यमंत्र्यांचा हा भित्रेपणा असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तसेच धनगर समाजाचा अंत पाहू नका, सध्या लोकशाही मार्गाने सनदशीर पद्धतीने आंदोलन सुरू आहे. आरक्षण न दिल्यास धनगर समाजदेखील कुठल्याही टोकाला जाऊ शकतो, असा खणखणीत इशाराही यावेळी पदाधिका-यांनी आपल्या भाषणातून दिला.
7 ऑगस्टला उस्मानाबादेत मोर्चा
धनगर समाज एसटी आरक्षण कृती समितीच्या वतीने 7 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले कमलाकर दाणे, यशवंत डोलारे, संदीप वाघमोडे, अनिल ठोंबरे यांची कोणतीही दखल न घेतल्यामुळे धनगर समाजात असंतोष पसरला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

फोटो - धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोकी येथील चौकात मेंढ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.