आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधी प्रचारात व्यस्त; शेतकरी विजेअभावी त्रस्त, महावितरणचा कारभार ढेपाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - चार वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर मोठ्या अपेक्षेने पेरणी केलेल्या पिकांवर अाता महावितरणमुळे गंडांतर येत आहे. एकदा नादुरुस्त झालेला ट्रान्सफाॅर्मर देण्यास १५ दिवसांपेक्षाही अधिक कालावधी लागत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिके माना टाकत आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची चिरीमिरीसाठी अडवणूक केली जात आहे. यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत.  

गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागला. यानंतर खरिपातील पिके अतिवृष्टीमुळे हातची गेली. मात्र, अतिवृष्टीमुळे लहानमोठे तलाव, तळ्यांमध्ये पाणी साठले आहे. नद्या, आेढे, नाले खळखळले. यामुळे चार वर्षांपासून कोरड्याठाक पडलेल्या शेतातील विहिरी व कूपनलिकांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने ज्वारी, हरभरा, गहू, करडई अशा रब्बीच्या पिकांची पेरणी केली. मुरपावसाऐवजी जोरदार धारा बरसल्यामुळे जमिनीत पाणी अपेक्षेप्रमाणे झिरपलेले नाही. यामुळे जमिनीत चांगली ओल निर्माण झालेली नाही. सद्य:स्थितीत रब्बी पिकांना पाणी देण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, पाणी असूनही महावितरणच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना हे शक्य होताना दिसत नाही.  
 
विजेची सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यात महावितरणने मागणीप्रमाणे वीज वितरण करण्याची यंत्रणा सक्षम केलेली नाही. यामुळे अधिक भार पडून ट्रान्सफार्मर नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांचे होणारे हाल न बघवणारे आहेत.
 
ट्रान्सफाॅर्मर महावितरणकडे दुरुस्तीसाठी आणून सोपवल्यानंतर शेतकऱ्यांना कार्यालयात सातत्याने फेऱ्या माराव्या लागतात. स्थानिक लाइनमन वरिष्ठ कार्यालयात शेतकऱ्यांना पाठवतात. उस्मानाबाद येथील कार्यालयात रोज येऊन ट्रान्सफाॅर्मर देण्याची विनंती करावी लागत आहे. मात्र, येथे केवळ आश्वासनाशिवाय हातात काहीही मिळत नाही. ट्रान्सफाॅर्मर देण्याची केवळ पुढची तारीख देण्यात येते. त्या तारखेतही ट्रान्सफाॅर्मर दिला जात नाही. तेव्हाही पुढील तारीखच सांगितली जाते. यामध्ये १५ ते २० दिवसांचा कालावधी निघून जात आहे. यादरम्यान शेतातील पिके माना टाकत आहेत. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी, डबडबणाऱ्या कूपनलिकांचा काहीही उपयोग होत नसल्याची परिस्थिती आहे.   

शेतकऱ्यांच्या माथी खर्च    
वास्तविक पाहता महावितरणकडून ट्रान्सफाॅर्मर काढून नेऊन दुरुस्त करून आणून बसवण्याचे काम होणे अपेक्षित आहे. यासाठी महावितरणकडून दिरंगाई होत आहे. यामुळे ट्रान्सफाॅर्मर काढून महावितरणच्या दुरुस्ती केंद्रात आणण्याचे कामही शेतकऱ्यांना करावे लागत आहे. यात शेतकऱ्यांना माेठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. टेंडर काढून लावलेली वाहने नेमके काय काम करतात, हा प्रश्न आहे.     

साहित्यही मिळवण्यास अडचण: जिल्ह्यातील अनेक डीपींची सध्या दुरवस्था झाली आहे. फ्यूज, वायर व अन्य साहित्य उपलब्ध होत नाही. यामुळे सातत्याने बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. शेतकऱ्यांनाच पदरमोड करून साहित्य विकत आणावे लागत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष आहे.
 
‘ते माझ्याकडे नाही’   
महावितरणचा कारभार अधीक्षक अभियंता प्रकाश पौणिकर यांनी स्वीकारल्यानंतर  अनागोंदी माजली आहे. त्यांचे कर्मचाऱ्यांवर काहीच नियंत्रण नसल्यासारखी परिस्थिती आहे. त्यांना ट्रान्सफाॅर्मरबाबत विचारले तर ‘ते काम माझ्याकडे नाही, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला भेटा’ असे सांगून जबाबदारी टाळण्याचे कृत्य त्यांनी केले. जिल्ह्याचा मुख्य अधिकारीच असे बोलत असेल तर शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न आहे.
 
भ्रष्ट कारभार वाढला   
महावितरणचे ग्रामीण भागातील कर्मचारी शेतकऱ्यांना अक्षरश: पिळून काढत आहेत. लहानमोठ्या कामांसाठी थेट पैसे मागितले जात आहेत. अणदूर (ता. तुळजापूर) येथील एका लाइनमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारीच रंगेहाथ पकडले आहे. या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नाही.   
 
असे हाेत आहेत शेतकरी हतबल   
{ अनसुर्डा शिवारातील ट्रान्सफाॅर्मर महिनाभरापूर्वी नादुरुस्त झाला. मोठा प्रयत्न करून २० दिवसांनी ट्रान्सफाॅर्मर दुरुस्त करून मिळाला. मात्र, लगेच तीन दिवसांत पुन्हा तो नादुरुस्त झाला. त्यानंतर प्रचंड पाठपुरावा करून ट्रान्सफाॅर्मर मिळाला. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले. नानासाहेब जमदाडे यांची दोन एकर ज्वारी व दोन एकर हरभरा हातचा गेला आहे. परिसरातील शेतकऱ्यांची अशीच अवस्था झाली आहे.   

{ वरवंटी येथील ट्रान्सफाॅर्मर दि. ३ फेब्रुवारीला बंद पडला. शेतकऱ्यांनी लेखी अर्जही दाखल केला. मात्र, महावितरणने याची काही दखल घेतली नाही. रमाकांत देशमुख यांच्या शेतात लिंबू, डाळिंबाची बाग आहे. त्यांनी गहू व ज्वारीही पेरली आहे. मोठ्या कष्टाने जोपासलेल्या बागेला पाणी नसल्यामुळे धोका वाढत आहे. पाणी असूनही वीज नसल्याने देशमुख पाहण्याशिवाय काही करू शकत नाहीत. 
बातम्या आणखी आहेत...