आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Puls Company: Sebi Starts Inquary To Account Holders

पर्ल्सचा गुंता: ठेवीदारांभोवती सेबीच्या चौकशीचा फेरा सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - आपल्या कंपनीकडे ७५ हजार कोटींच्या ठेवी, लाखो हेक्टर जमीन असल्याचे भासवून पॉलिसींची संख्या वाढवणा-या पर्ल्स कंपनीचे खरे रूप समोर येऊ लागले आहे. कुठल्याही प्रकारची जमीन कंपनीच्या नावावर नसून सोलापूरमध्ये दाखवण्यात आलेल्या जमिनीवरही संबंधित शेतक-यांचा कब्जा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पर्ल्समध्ये गुंतवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर बनत चालली आहे. दरम्यान, पर्ल्समध्ये पैसे गुंतवलेल्या बड्या ठेवीदारांचीही चौकशी सेबीने सुरू केली असून, त्यामुळे ठेवीदारांना ही रक्कम कोठून आणली, याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

पर्ल्समध्ये गुंतवणूक करणा-यांच्या ठेवी परत मिळत नसल्याचे वृत्त सर्वप्रथम 'दिव्य मराठी'ने प्रकाशित केले. त्यानंतर त्याचा पाठपुरावाही केला. 'दिव्य मराठी'ने हे प्रकरण छेडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली. ठिकठिकाणच्या पर्ल्सच्या कार्यालयांमध्ये गर्दी वाढली आहे. येथील कार्यालय ३ दिवसांनंतर उघडण्यात आले. मात्र, ठेवीदारांना केवळ व्यवहार बंद असल्याचा फलक पाहून परत जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कंपनीने मुदत संपूनही पैसे न दिल्याने अनेक गावांमधले अर्थकारण धोक्यात आले आहे. मुला-मुलींच्या लग्नासाठी, आजारासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना हक्काची रक्कम परत हवी आहे. मात्र, मागायची कुणाकडे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

का बिघडले गावांचे अर्थकारण?
जिल्ह्यातील कुठल्याही गावामध्ये गेल्यास ठेवीदारांची यादी पुढे येते. कुणाचे १० हजार, कुणाचे १ लाख, तर बड्या शेतक-यांचे ५ ते २५ लाख रुपये पर्ल्समध्ये जमा आहेत. वाड्या-तांडे, वस्त्यावर वास्तव्य करणा-यांनीही पर्ल्समध्ये आपली आयुष्यभराची पुंजी जमा केली आहे. जिल्ह्यात सहकारी बँकांचे जाळे असले तरी जिल्हा बँकेची अवस्था दोलायमान झाली आहे. ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या तुलनेने अत्यल्पच आहे. त्याचा फायदा कंपनीने उचलला. दरमहा हप्त्याची रक्कम घरापर्यंत येऊन नेणारे एजंट आणि १२ टक्के व्याजदराचे गाजर पर्ल्सने दाखवल्यामुळे सगळेच या जाळ्यात अडकले. ताकविक्रीसारख्या छोट्याशा म्हणजे ११०० कुटंुबे असलेल्या गावामधून कंपनीकडे १ कोटीवर ठेवी जमा आहेत. बेंबळी, भानसगाव, कौडगाव अशा किती तरी गावांमधून कोट्यवधींची रक्कम २० वर्षांमध्ये गोळा करण्यात आली आहे.

जमिनीचा पत्ता नाही?
कंपनीच्या माहिती पुस्तिकेमध्ये दाखवण्यात आलेली सोलापूरच्या बोरामणी येथील ६१९ एकरपैकी ४०० एकर जमीन विमानतळासाठी विक्री करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला होता. वास्तविक, या जमिनीशी कंपनीचा कुठलाही संबंध नसल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. संबंधित जमिनीवर शेतक-यांचा ताबा असून, बोरामणीच्या तलाठ्यानेही कंपनीच्या नावावर कुठलाही फेरफार झाला नसल्याचे सांगितले आहे. मात्र, मुख्त्यार पत्राद्वारे ही जमीन कंपनीने घेतली होती, असे सांगितले जात आहे. हजारो कोटींच्या ठेवी कंपनीकडे असताना अधांतरी व्यवहार केलेली जमीन कुणासाठी पुरणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे कंपनीची जमीन नव्हे, तर आता केवळ भाड्याच्या जागेतील रिकामी कार्यालये उरली आहेत.

एजंटांचीही चौकशी
सेबीकडून कंपनीकडे सर्वाधिक ठेवी असणारे ग्राहक तसेच सर्वाधिक रक्कम कमावणा-या एजंटांची चौकशी करण्यात येत आहे. १० लाखांहून अधिक रक्कम गुंतवणा-यांना नोटीस पाठवून ही रक्कम आपली आहे काय, असल्यास ती कोठून आणली, अशा स्वरूपाची विचारणा करण्यात येत आहे. कमिशनमधून रक्कम कमावणा-या एजंटांचेही यासंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. अनेकांनी वकिलामार्फत सेबीला तपशील कळवला आहे.