आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबीसीच्या तपासासाठी पुणे सीआयडी परभणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - दाम दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाखाली हजारो लोकांना कोट्यवधींचा चुना लावणा-या के.बी.सी. मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या तपासासाठी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिका-यांचे पथक बुधवारपासून (दि.२९) परभणीत दाखल होणार आहे. तीन दिवस ३१ जुलैपर्यंत हे पथक पोलिस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या सीआयडी कार्यालयात हजर राहणार आहे. गुंतवणूकदारांच्या लेखी तक्रारी व चौकशी हे पथक करणार आहे.

नाशिक येथील केबीसी कंपनीने संपूर्ण राज्यातच गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक लोकांना कंपनीने प्रतिनिधी म्हणून नियुक्त करीत लोकांना जास्त व्याजदराने, कमी मुदतीत दाम दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवले. निरनिराळ्या योजना राबवून कोट्यवधींची माया जमा केली. मुदतपूर्तीनंतर ठेवीदारांना रक्कम परत न करता तिचा
अपहार करून फसवणूक केली.

यासंदर्भात परभणीतील कोतवाली, नानलपेठ व नवा मोंढा पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत.

राज्य सरकारने हा तपास सीआयडीकडे सोपविल्यानंतर पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या भरारी पथकाकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक ए. आर. जाधव यांच्यासह निरीक्षक डी. डी. जगदाळे व निरीक्षक डी. एस. वांजळे हे तपास करीत आहेत.
या गुन्ह्यामध्ये ज्या ठेवीदारांची फसवणूक झालेली आहे. त्यातील काही ठेवीदारांकडे तपास करण्यात आलेला आहे, परंतु ठेवीदारांचे पूर्ण नाव व पत्ते नसल्याने तपास करण्यात आलेला नाही. एकूण गुंतवणूकदार व एकूण रकमेचाही शोध पूर्ण झालेला नाही.