आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णा शहरात साकारणार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- देशभरात रेल्वे मार्गांवर होणा-या 91 पैकी 11 पथदर्शी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्णा रेल्वेस्थानकाचा समावेश झाला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 13 मार्च रोजी हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे या पथदर्शी प्रकल्पात आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत. पूर्णेत रेल्वेची 26 एकर जागाही उपलब्ध झाल्याने आरोग्य मंत्रालयाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

देशभरात रेल्वे मार्गांवर प्रवासी, रेल्वे कर्मचारी व इतर नागरिकांसाठी रेल्वेच्या मोकळ्या जागांवर आरोग्य सुविधा देण्याचे रेल्वे मंत्रालयाने निश्चित केले आहे. 2010-11 च्या रेल्वे अर्थसंकल्पात याचा समावेश करीत 522 ठिकाणी ही हॉस्पिटल्स उभारण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी रेल्वे व आरोग्य मंत्रालयात सामंजस्य करारही झाला आहे. रेल्वेने जागा उपलब्ध करून द्यावयाचे व आरोग्य मंत्रालयाने तेथे आरोग्य सुविधा पुरवायच्या असे या कराराचे स्वरूप आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 522 पैकी 91 ठिकाणी पथदर्शी प्रकल्प उभारण्याचे निश्चित झाले आहे. त्यापैकी 11 ठिकाणी रेल्वेच्या उच्चस्तरीय समितीने प्रत्यक्ष टेस्टिंगसाठी पाहणी केली होती. त्यात 11 जागा निश्चित झाल्या. या 11 ठिकाणी प्रकल्पाचे प्रत्यक्ष कार्यान्वयन करण्याचे निश्चित झाले; परंतु त्यात प्रारंभी पूर्णेचा समावेश झाला नव्हता. मराठवाड्याचे मध्यवर्ती केंद्र, जंक्शन व जागेची मोठी उपलब्धता असलेले पूर्णा हे एकमेव ठिकाण लक्षात घेता, या ठिकाणी हा प्रत्यक्ष कार्यान्वयनतेचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यासाठी खासदार अ‍ॅड. गणेश दुधगावकर यांनी प्रस्ताव सादर करून पाठपुरावा सुरू केला होता. त्यास समितीच्या पाहणीनंतर मंजुरी मिळाली. दक्षिण मध्य रेल्वेच्या व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पूर्णा रेल्वेस्थानकाच्या मालकीची 26 एकर जागाही या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित करण्यात आली आहे.

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी 13 मार्च रोजी त्यास मंजुरी देत समावेशासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. आरोग्य मंत्रालयालाही तसे कळवण्यात आले आहे.

हॉस्पिटलमध्ये ओपीडी, डायग्नोस्टिक सेंटर- मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ओपीडी व डायग्नोस्टिक सेंटर सुरू होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने त्यादृष्टीने या ठिकाणी पायलट प्रोजेक्टअंतर्गत पूर्णेचा समावेश करून घ्यावा, असेही रेल्वेमंत्री बन्सल यांनी आरोग्य मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्या पत्राची प्रत खासदार दुधगावकर यांनाही पाठवली आहे.