आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: बाहेरून उत्तरे; जलसंपदाचा पेपर फुटला !

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- जलसंपदा विभागाची सरळ सेवा भरती परीक्षा सुरू असताना बाहेरून कागदावर लेखी उत्तरे आली. शहरातील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे केंद्रावर रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. एक तासातच पेपर फुटल्याची तक्रार परीक्षार्थींनी नियंत्रकांकडे केली असता अर्ज फाडून परीक्षार्थींनाच नियंत्रकांनी धमकावल्याच्या गंभीर प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली.
जलसंपदा विभागांतर्गत औरंगाबाद प्रादेशिक निवड समितीद्वारे वरिष्ठ लिपिक/भांडारपाल, सहायक भांडारपाल, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आणि दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, शिपाई, चौकीदार, कालवा चौकीदार या पदांच्या परीक्षा रविवारी सकाळी दहा ते बारा आणि दुपारी दोन ते चार अशा दोन सत्रांत घेण्यात आल्या. शहरातील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे या 214 क्रमांकाच्या केंद्रांवर 10 परीक्षा हॉलमध्ये 230 परीक्षार्थींची व्यवस्था करण्यात आली होती.
पहिल्या सत्रातील परीक्षा सुरू असताना हॉल क्रमांक चार मध्ये एका परीक्षार्थीला बाहेरून कागदावर लिखित उत्तरे मिळाली. त्यामुळे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी परीक्षार्थींनी आक्षेप घेऊन परीक्षा नियंत्रक प्रशासक जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण तथा अधीक्षक अभियंता आर.जे. कांबळे यांच्याकडे धाव घेऊन लेखी तक्रार दिली असता नियंत्रकांनी ती फाडून टाकली व परीक्षार्थीनाच धमकावले. संतप्त झालेल्या परिक्षार्थींनी बंदोबस्तावर असलेले पोलिस उपनिरीक्षक शाहीदखान पठाण यांच्याकडे पेपर फुटल्याची चौकशी करावी या मागणीचे निवेदन दिले. यात अभय केंद्रे, सारुक विष्णू, संतोष चव्हाण, आबासाहेब ढाकणे, बालाजी तिडके यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान जलसंपदा विभागाचा पेपर फुटल्याची तक्रार खुद्द परीक्षार्थींनीच पोलिसांकडे केली असून पोलिस आता काय कारवाई करतात याकडे परीक्षार्थीचे लक्ष लागले आहे. परीक्षा नियंत्रकांनीच विद्यार्थ्यांना अरेरावी केल्यामुळे विद्यार्थ्यांत संतापाची लाट उसळली आहे.
कांबळेंची परीक्षार्थींनाच अरेरावी
परीक्षा सुरू असताना पेपर फुटल्याची माहिती परीक्षार्थींना समजली. पेपर संपल्यानंतर उमेदवारांनी परीक्षाप्रमुख अधीक्षक अभियंता तथा जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक आर.जे. कांबळे यांच्याकडे जाऊन त्यांना प्रकार सांगितला. तुम्हाला काय कारायचे ते करा. लेखी तक्रार द्या. अशी अरेरावीची भाषा वापरून परीक्षार्थींनाच धमकाविले. त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला.
‘तो’ परीक्षार्थी कोण ?
परीक्षा सुरू असताना एक ते दीड तासातच बाहेरून लेखी उत्तरे कशी आली? कोणी आणून दिली? हॉलमधील परीक्षार्थीकडे ती कशी पोहचली? तो परीक्षार्थी कोण? याची चौकशी झाली पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया परीक्षार्थींनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
शासनाच्या सर्व परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिकांसह उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देणे गरजेचे आहे. यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शीपणा दिसून येतो. यामुळे सर्व उमेदवारांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी मिळाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहे.’’ एस.जी. राऊत, अध्यक्ष, गांधीगिरी समाज सेवक संघ.

काहीच घडले नाही
या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना तीन वेळा भेट दिली. पेपर फुटला नसून काहीच घडले नाही. कोणी माझ्याकडे लेखी तक्रारही दिली नाही त्यामुळे ती फाडण्याचा प्रश्न नाही.’’ आर.जे. कांबळे, अधीक्षक अभियंता तथा जायकवाडी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक
प्रश्नपत्रिका परत का घेतल्या ?
संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवापूर्व व मुख्यपरीक्षेचे आयएएस, आयपीस परीक्षार्थी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर्ग अ, ब आणि अराजपत्रित ब पदाच्या परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिली जाते. जलसंपदा विभागाच्या परीक्षेची प्रश्न पत्रिकाही परत का घेतल्या ? असा प्रश्नही परीक्षार्थींनी उपस्थित केला.