आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कोटींच्या बनावट नोटा 50 लाखांत विकणारे टोळके जेरबंद, हिंगोलीतील दुसरी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- ५० लाखांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात २ कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा देण्यासाठी आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील टोळक्याला हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नोटांचा व्यवहार करताना रंगेहाथ पकडले. या टोळीतील ५ जणांना अटक करण्यात आली  आहे.  

येथील गवळीपुरा भागातील विजय काळे पाटील (२५) यांना यवतमाळ येथील एका व्यक्तीने खऱ्या नोटांच्या बदल्यात चारपट किमतीच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवले. या अामिषाला बळी न पडता विजय काळे यांनी  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मारुती थोरात यांच्याकडे ११ ऑगस्ट रोजी तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला.  काळे यांनी या टोळीला १३ ऑगस्ट रोजी कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे रक्कम घेऊन येण्यास सांगितले.    स्थानिक गुन्हे शाखेने दुपारी ३.३० च्या सुमारास वारंगा येथे सापळा लावला.  टोळीचा प्रमुख अफरोज खान वारंगा फाटा येथे साथीदारांसह दाखल झाला.  हदगाव रस्त्यावर जीपमध्ये पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार सुरू होताच पथकाने कारवाई फत्ते केली. या टोळीकडून २ हजारांच्या प्रत्येकी १०० नोटांचे ६७ बंडल असे ( १ कोटी ३४ लाख), ५०० रुपयांच्या प्रत्येकी १०० नोटा असलेले ६५ बंडल (३२ लाख ५० हजार) असे एकूण १ कोटी ६६ लाख ५० हजारांच्या  बनावट नोटा जप्त केल्या. या बंडलांच्या खालच्या आणि वरच्या बाजूला २ हजार रुपयांच्या ८ नोटा आणि ५०० रुपयांच्या ८  नोटा लावण्यात आल्या होत्या. या नोटाही पोलिसांनी जप्त केल्या.   याशिवाय ३ लाख रुपये किमतीची इंडिका कार (एमएच ३४ एएम २१४४), ५० हजारांची  हीरो होंडा सीबीझेड दुचाकी (एमएच २६ एए ८३५३), विनाक्रमांकाची ८० हजार किमतीची होंडा कंपनीची दुचाकी व सहा मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.    

पाच जणांना बेड्या : या टोळीचा म्होरक्या अफरोज खान जमीर खान पठाण (३३, व्यवसाय- मोबाइल विक्री, रा. मेमन कॉलनी, यवतमाळ) हा आहे.  पोलिसांनी त्याच्यासह  शेर खान मुनवर खान (२२, धंदा- ट्रकचालक, रा. उमरखेड),    शेख समीर शेख इलियास (२१, धंदा- ट्रक क्लीनर, रा. उमरखेड), शेख रहमान शेख इस्माईल (२२,   रा.  उमरखेड), मोहंमद सदब शेख मेहबूब (३७,   रा. यवतमाळ) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
हिंगोलीतील दुसरी घटना  
यापूर्वी हिंगोली पोलिसांनी औंढा नागनाथ येथे अशीच एक टोळी रंगेहाथ पकडली होती. निलंबित पोलिस कर्मचारी गजानन निर्मले यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेत तक्रार केली होती. त्यानुसार खऱ्या ५ लाखांच्या बदल्यात ५० लाख किमतीच्या बनावट नोटा  देणाऱ्या हैदराबाद येथील टोळीला तीन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ५ जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून सुमारे ४ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...