आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानसोपचार केंद्रात मुख्यमंत्र्यांनाच दाखल करण्याची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - दहा महिन्यांत ८०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या महाराष्ट्रात राज्य सरकार या आत्महत्यांवर उपाययोजना करण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी जिल्हा स्तरावर मानसोपचार केंद्रे सुरू करत आहे. या मानसोपचार केंद्रांत मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनाच दाखल करण्याची गरज आहे. तेथे त्यांच्यावर संवेदनशील होण्यासाठीच्या उपचारांची गरज आहे, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी येथे केली.

परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विखे पाटील गुरुवारी आले होते. दिवसभरात त्यांनी पोखर्णी, इंदेवाडी, साळापुरी, दैठणा, पोरवड या गावांना व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटी देऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, उपमहापौर भगवान वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार आदी उपस्थित होते.

नांदेडला रवाना होण्यापूर्वी सायंकाळी विखे पाटील यांनी सावली विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संपूर्ण मराठवाड्यासह सोलापूर व नगर जिल्ह्याचा काही भाग भीषण दुष्काळाखाली आहे. मराठवाड्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या असताना राज्य सरकार संपूर्ण कर्जमाफी देण्यास तयार नाही. कायमस्वरूपी दुष्काळमुक्तीची भाषा केली जात अाहे. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शुल्कमाफीचाही निर्णय घेतलेला नाही. पालकांनाच आता हमी योजनेच्या कामांवर जाण्याची वेळ आली आहे.

भावनांशी खेळू नका
दुष्काळामुळे स्थलांतरणाची व पर्यायाने आगामी काळात अनेक सामाजिक प्रश्नांची निर्मिती होणार आहे. तरीदेखील राज्य सरकार हे लोंढे थांबवण्यासाठी मनरेगाची कामे सुरू करीत नाही. कामे सुरू करण्याऐवजी मानसोपचार केंद्रे सुरू करणे म्हणजे या सरकारच्या बौद्धिक दिवाळखोरीची कीवच करावीशी वाटते. हे असले फार्स थांबवा, जनतेच्या भावनांशी खेळू नका, असा इशाराही विखे पाटील यांनी दिला. पत्रकार परिषदेस रवी पतंगे-देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, इरफानूर रहेमान खान, बाळासाहेब फुलारी आदी उपस्थित होते.