आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त राधेमाँ गुरुद्वारात, दरबारसाहिबच्या दर्शनानंतर हॉटेलात रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- औरंगाबादहून शुक्रवारी मध्यरात्री निघालेल्या वादग्रस्त आध्यात्मिक गुरू राधेमाँ यांनी शनिवारी सकाळीच सचखंड हुजूरसाहिब गुरुद्वारात हजेरी लावून दर्शन घेतले. जवळपास अर्धा तास दरबारसाहिबमध्ये थांबल्यानंतर त्या येथील एका हॉटेलात मुक्कामासाठी रवाना झाल्या. एका महिलेचा छळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल असून औरंगाबादच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांची शुक्रवारी रात्री दोन तास कसून चौकशी केली. परंतु त्यांच्या अटकेची गरज नसल्याचा निरोप मुंबईहून मिळाल्यानंतर कोणतीही कारवाई न करताच हे पथक माघारी परतले होते.

राधेमाँ सकाळी साडेसहाच्या सुमारास गुरुद्वारात पोहोचल्या. दरबारसाहिबमध्ये दर्शन घेतल्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने त्या एका हाॅटेलकडे रवाना झाल्या. त्यांच्यावर मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या येथील वास्तव्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी विमानतळ पोलिसांनी हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
गुरूने शिष्यांसोबत नाचण्यात वावगे काय?
दूरचित्रवाहिन्यांवर सध्या जो नाचण्याचा व्हिडिओ दाखवला जातो तो त्यांच्या खासगी जीवनातील आहे. आई आपल्या मुलांसोबत नाचू-गाऊ शकत नाही का? देव भक्तांसोबत नाचू शकत नाही? गुरू शिष्यांसोबत नाचू शकत नाही का? त्यात वावगे काय? आणि एखाद्याच्या खासगी आयुष्यातल्या गोष्टी दाखवल्या जाव्यात काय? असा सवाल राधेमाँचे भक्त संजीव गुप्ता यांनी केला.
चौकशी नाही, फक्त लक्ष
राधेमाँविरुद्ध कोणतेही अटक वॉरंट निघालेले नाही. लूक आऊट कॉर्नर नोटीस नाही. त्यामुळे त्यांची कोणतीही चौकशी केलेली नाही. आम्ही त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहोत, असे नांदेडचे जिल्हा पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.