आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राघुचीवाडी येथील ग्रामस्थांनी टाकला मतदानावर बहिष्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - नगरपालिका क्षेत्रात समावेश केल्यामुळे विकासकामांपासून वंचित राहण्याची वेळ आल्यामुळे वैतागलेल्या राघुचीवाडी, केकस्थळवाडी व जाधववाडी येथील ग्रामस्थांनी नगरपालिकेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार राघुचीवाडी येथील ग्रामस्थांनी चिवटपणे आपल्या निर्धारावर ठाम राहून मतदानाकडे पाठ फिरवली. जाधववाडी व केकस्थळवाडी येथे ऐनवेळी काही ग्रामस्थांनी कच खाल्ल्यामुळे येथे बहिष्काराचाच फज्जा उडाला.

शहरालगत असलेल्या या तिन्ही गावांचा काही वर्षांपूर्वी उस्मानाबादच्या हद्दवाढीमध्ये समावेश करण्यात आला. या गावांच्या विकासासाठी सुरुवातीला २० कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, शासनाने २००८ पूर्वी हद्दवाढीमध्ये समावेश झालेल्या भागांना निधी न देण्याचे धोरण जाहीर केले. यामुळे या तिन्ही गावांमध्ये रस्ते, नाली व पाण्याच्या दृष्टीने चांगलीच पीछेहाट झाली. ग्रामस्थांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी नगरपालिकेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राघुचीवाडी येथील ग्रामस्थांनी चिवटपणे आपल्या बहिष्कार ठाम राहून मतदान होऊ दिले नाही. येथे १०८३ मतदार आहेत. यापैकी सकाळच्या दरम्यान दोघांनी मतदान केले. नंतर दुपारपर्यंत कोणीही फिरकले नाही. दुपारनंतर मात्र, परत तीघांनी मतदान केले. यामुळे येथे मतदान करणाऱ्यांची संख्या पाचवर पोहोचली.

केकस्थळवाडी येथील ग्रामस्थांचा संयम लवकरच तुटला. सकाळनंतर काहींनी मतदान करण्यास सुरुवात केली. एकमेकांचा अंदाज घेत १३९ जणांनी मतदान केले. येथे २३० मतदारांची संख्या आहे.

प्रशासनाकडून समुपदेशन : जाधववाडी येथे दुपारी दोन वाजेपर्यंत तीव्रतेने बहिष्कार टाकण्यात आला होता. मात्र, त्यानंतर मंडळअधिकारी व तलाठ्यांनी येऊन येथे मतदारांचे समुपदेशन केले.

सर्व पक्षांना फटका
यापूर्वी या गावाने भाजप व काँग्रेसच्या उमदेवारांना सहकार्य केले होते. या गावांचा समावेश असलेल्या प्रभागातून पूर्वी एक भाजप व तीन काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. नंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बाजी मारली होती. यामुळे या बहिष्काराचा फटका कमीअधिक प्रमाणात सर्वच पक्षांना बसणार आहे.
बातम्या आणखी आहेत...