आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विद्यापीठात रॅगिंग;कोंडून बेल्टने मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या नावाखाली सीनियर्सनी बेल्टने मारहाण करत हॉस्टेलच्या खोलीत डांबून ठेवण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. घटना कळताच पोलिसांनी कोंडलेल्या 15 विद्यार्थ्यांची खोलीतून सुटका केली. पोलिसांनी 14 विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

विद्यापीठ परिसरातील वसंत हॉस्टेलमध्ये प्रकार घडला. 15 विद्यार्थ्यांना रात्री दहाच्या सुमारास हॉस्टेलमध्ये राहणार्‍या बी.एस्सी. तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी रांगेत उभे केले. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे ज्युनियर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग का घेतली नाही, असे विचारत तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पाठ, पाय व मांडीवर बेल्टने मारहाण केली. या विद्यार्थ्यांना तिसर्‍या मजल्यावरील खोली 154 मध्ये कोंडले. दरम्यान, नवा मोंढा पोलिसांना निनावी फोनद्वारे हा प्रकार समजला. इन्स्पेक्टर सुनील जैतापूरकरसह पोलिसांनी विद्यार्थ्यांची सुटका केली. या प्रकरणी गजाजन अवचार (रा. राजनी, ता. लोणार) याच्या फिर्यादीवरून 14 विद्यार्थ्यांना अटक झाली. न्यायालयात त्यांची जामिनावर सुटका झाली. महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल असून, ते सिद्ध झाल्यास आरोपींना 2 वर्षे कॉलेजातून बडतर्फ केले जाऊ शकते.

आरोपींची नावे - नितीन वामनराव बोरकर, सचिन शिवराम चव्हाण, अजय गुलाब साळवे, राजेश आदिनाथ शिराळे, विजय औदुंबर मोगीरवार, रोहित बाबुराव पवार, अमोल सुरेश वैद्य, चंद्रकांत धुरेकर, अमोल बांगरे, प्रभाकर काकडे, एकनाथ गुंजाळ, विजय औटी, सचिन नावकर, पंकज मस्के अशी आरोपींची नावे आहेत.