आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी महिलांवर पाळत ठेवतात;जालन्यातील सभेत राहुल गांधींचे टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - भाजपशासित राज्यांत महिला सुरक्षित नाहीत. कर्नाटकमध्ये भाजपचेच लोक महिलांना मारहाण करतात, तर मध्य प्रदेशातून 20 हजार महिला बेपत्ता आहेत. नरेंद्र मोदींच्या देशभरातील पोस्टर्सवर महिलांना शक्ती देण्याचा उल्लेख आहे. मात्र, हेच गुजरातचे मुख्यमंत्री महिलांवर पोलिसांकरवी पाळत ठेवतात, अशी तोफ राहुल गांधी यांनी डागली.

काँग्रेस-आघाडीचे जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विलास औताडे व औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवार नितीन पाटील यांच्या प्रचारार्थ जालना येथे गुरुवारी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. सायंकाळी 5.48 वाजता गांधी सभास्थळी दाखल झाले. सुरुवातीला 5 मिनिटे मुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मोदींवर टीकेची झोड उठवत राहुल गांधी यांनी भाषणाला सुरुवात केली.

काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत. दुसरीकडे भाजप मात्र गरीब आणि श्रीमंत असे दोन भारत तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. आम्ही सर्व काही प्रेमाने करतो, त्यांच्या बोलण्यात मात्र कायम क्रोध असतो ते कुणाबद्दलच चांगले बोलत नाही, असा निशाणा त्यांनी मोदींवर साधला.

महिलांना आरक्षण देणार : महिलांमध्ये शक्ती आहे. घर चालवतात तशा त्या देश चालवत आहेत. त्यामुळे त्यांना सन्मान देण्याची गरज आहे. महिलांना 35 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला. मात्र, भाजपने संसदेचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे हे विधेयक संमत होऊ शकले नाही, परंतु यूपीए पुन्हा सत्तेवर आल्यास महिलांना विधानसभा आणि लोकसभेत 35 टक्के आरक्षण देऊ. त्याशिवाय पोलिस दलात 25 टक्के आरक्षणासोबत 2 हजार महिला पोलिस ठाणे निर्माण करणार असल्याचेही राहुल म्हणाले.

आता मेड इन इंडिया पाहिजे..
युवकांच्या हातात जे घड्याळ आहे, टी शर्ट आहे ते ‘मेड इन चायना’ आहे. देशात उद्योग व रोजगार वाढले पाहिजेत. मेड इन चायनाऐवजी आता मेड इन इंडिया, मेड इन महाराष्ट्र दिसले पाहिजे..

आरोग्य, घर, पेन्शनचा अधिकार
यूपीए 3 केंद्रात सत्तेवर आल्यास मोठय़ा रुग्णालयात गरिबांना मोफत उपचार व औषधी, प्रत्येकाला घर आणि गरिबांना पेन्शन हे तीन महत्त्वाचे अधिकार मिळतील, असेही राहुल म्हणाले.