आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Raised Local Issues Following Modi, Divya Marathi

राहुल गांधींचे मोदींच्या पावलावर पाऊल, औशातील भाषणात स्थानिक मुद्यांचा उल्लेख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र : काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी रायगड जिल्ह्यातील महाड येथेही जाहीर सभा झाली. त्या वेळी उपस्थित महिलांनी राहुल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.)
औसा - लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत वेगवेगळ्या विषयांवर भाषण करायचे. ज्या ठिकाणी सभा असेल तेथील भाषेत व स्थानिक मुद्द्यांना स्पर्श करीत उपस्थित प्रेक्षकांना बोलते करायचे. त्यांच्या भाषणाची ही पद्धत लोकांना खूपच भावली. परिणामी देशभरातील जनतेने त्यांच्या पदरात भरभरून यश टाकले. कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेत त्यांच्याच पावलावर पाऊल टाकल्याचे दिसून आले. बुधवारी लातूर जिल्ह्यातील औशातील सभेत राहुल यांनी स्थानिक मुद्द्यांचा संदर्भ देत केलेले भाषणही स्थानिक लोकांना भावले.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पावन भूमीत, महाराष्ट्रात पाऊल टाकल्याचा उल्लेख करून राहुल गांधींनी आपल्या भाषणाला सुरुवात
केली. लोकसभेला लातूरमध्ये झालेल्या भाषणाच्या तुलनेत या वेळी राहुल जास्त तयारीनिशी आल्याचे जाणवले. त्यांच्या भाषणात मुद्द्यांची मांडणी अत्यंत चांगली होती. आपल्या २० मिनिटांच्या आत्मविश्वासपूर्ण भाषणात त्यांनी यूपीएच्या सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची पुन्हा उजळणी केली. तसेच राज्यातील आघाडी सरकारने केलेल्या कामांचे कौतुकही केले.

पृथ्वीराजबाबांचे कौतुक
लोकसभेच्या वेळी राहुल रोजगार गॅरंटी बिल, अन्न सुरक्षा विधेयक, शिक्षण हक्क कायदा आदी देशपातळीवर मुद्द्यांच्या पुढे सरकतच नव्हते. या वेळी मात्र त्यांनी मराठवाड्यात गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळाचा उल्लेख केला. तसेच या भागाची पाहणी केली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केल्याचे दिसून आले, असे सांगत पृथ्वीराज चव्हाणांचे कौतुकही केले. औशाचे आमदार बसवराज पाटील यांनी मतदारसंघात चांगली कामे केल्याचेही राहुल यांनी नमूद केले.
किल्लारीचा बंद पडलेला साखर कारखाना त्यांनी सुरू केल्याने शेतक-यांना फायदा झाला, असे सांगत राहुल यांनी स्थानिक विषय प्रकर्षाने मांडला. यापूर्वी कधीच त्यांनी आपल्या भाषणात स्थानिक नेत्यांचा साधा उल्लेखही केल्याचे आठवत नाही. आजवर झालेल्या सभेत राहुल गांधी यांच्या व्यासपीठावर एखाददुसरा अपवाद वगळता कधीच स्थानिक नेत्यांना जागा मिळत नव्हती. त्यांना फारसे जवळही येऊ दिले जात नव्हते. आैशातील सभेच्या वेळी मात्र स्थानिक नेत्यांसोबत राहुल यांनी हस्तांदोलन करत त्यांनाही धक्काच दिला. तसेच काँग्रेसच्या उमेदवारांना व्यासपीठावर बोलावून त्यांच्यासह अभिवादन केले. काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील, अमित देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना छोटेखानी का होईना भाषणाचीही संधी मिळाली. या सर्व घडामोडी आजवरच्या काँग्रेसी संस्कृतीला छेद देणारे होते, याचीच चर्चा होती.

अखेर विलासरावांची आठवण
लोकसभेला लातूरमध्ये झालेल्या भाषणात त्या वेळेसच्या उमेदवाराला राहुल यांच्या पाठीमागच्या रांगेत बसवण्यात आले होते. तसेच लातूरचे भूमिपुत्र, दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाचा साधा उल्लेखही राहुल गांधींनी केला नव्हता. सभा संपल्यापासून ते मतदानापर्यंत राहुल गांधी विलासरावांना कसे काय विसरले, असा प्रश्न जिल्ह्यातील मतदार विचारायचे. या वेळी मात्र राहुल यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी ‘दिवंगत विलासराव देशमुख’ असा नामोल्लेख केला. ‘आज विलासराव आपल्यात नाहीत आणि शिवराज पाटील चाकूरकरही येथे उपस्थित नाहीत. त्यांच्या कामाकडे पाहून काँग्रेसला मतदान करण्याची जबाबादारी तुमच्यावर आहे,’ असे आवाहन राहुल गांधींनी करताच उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात त्यांना प्रतिसाद दिला.