आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णा स्टेशनवर रेल रोको आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - पूर्णा येथील रेल्वेचे क्रू-बुकिंग हे महत्त्वाचे कार्यालय नांदेड येथे हलवण्याच्या दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात पूर्णेतील नागरिक संतप्त झाले. सर्वच राजकीय पक्ष, संघटना व नागरिकांच्या 10 हजारांच्या जनसमुदायाने सकाळी तीन तास रेल रोको आंदोलन केले.

शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, या आंदोलनाने नांदेड ते मनमाड मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. चार तास रेल्वे गाड्या उशिराने धावल्या. दक्षिण-मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असलेल्या पूर्णेतून रेल्वेची विविध कार्यालये स्थलांतरित करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत सातत्याने झालेले आहेत. काही दिवसांपूर्वीच रेल्वेच्या अधिकार्‍यांनी व नांदेडच्या नेतेमंडळींनी येथील क्रू-बुकिंगचे कार्यालय नांदेड येथे स्थलांतरित करण्याचा घाट घातला आहे.

या निर्णयाविरोधात खासदार अँड. गणेशराव दुधगावकरांनी रेल्वे प्रशासनास आठच दिवसांपूर्वी इशारा दिला होता. कोणत्याही स्थितीत हे कार्यालय स्थलांतरित न होऊ देण्यासाठी पूर्णा तालुका व जिल्ह्यातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आम आदमी पार्टी, रिपाइं, भीमशक्ती, एमआयएम, बहुजन महासंघ, व्यापारी महासंघ, पत्रकार संघ अशा विविध राजकीय पक्ष, संघटना व नागरिकांनीही या प्रकारास विरोध दर्शवला आहे. त्यासाठी सकाळी हजारोंच्या संख्येने रेल्वेस्थानकावर आलेल्या जनसमुदायाने रेल्वेमार्गावर तीन तास ठाण मांडले. तत्पूर्वी, शिवाजी चौकातून सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. आंदोलनात आमदार संजय जाधव, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे आदी सहभागी झाले होते.

कार्यकर्ते, पोलिसांत चकमक
तिरुपती-अमरावती ही इंटरसिटी गाडी तब्बल तीन तास रोखून धरली. कार्यकर्त्यांचा जनक्षोभ पाहून नांदेडहून पूर्णेकडे येणारी सचखंड एक्स्प्रेस चुडावा रेल्वेस्थानकावरच दोन तास थांबवण्यात आली. पूर्णेतील आंदोलन संपल्यानंतर ती बारा वाजता सोडण्यात आली. नागरिक व कार्यकर्ते रेल्वेमार्गावरून हटण्यास तयारच नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते व पोलिसांत चकमकही उडाली.