जालना - केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वच श्रेणींच्या रेल्वे भाड्यात 14.2 टक्के वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. नियमित प्रवास करणा-या प्रवाशांसोबत पासधारकांनाही त्याचा फटका बसणार आहे. नव्या दरवाढीमुळे जालना-औरंगाबाद पॅसेंजर प्रवासासाठी 15 ऐवजी 20 तर एक्स्प्रेससाठी 35 ऐवजी 40 रुपये मोजावे लागणार आहेत.
इतर वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि स्वस्त असल्याने प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. जालना शहरातून औरंगाबादला जाणा-या प्रवाशांचीच संख्या अधिक
आहे. यात नियमित प्रवास करणा-या विद्यार्थी तसेच नोकरदारवर्गाची संख्या मोठी आहे. जालना रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे 5 हजार 200 प्रवासी विविध ठिकाणी प्रवास करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.