जालना/लातूर - गारपीट आणि दुष्काळाचा चक्रव्यूह भेदून कडवंचीतील शेतक-यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे द्राक्षबागा जगवल्या. मात्र, निसर्गाने
आपल्या लहरीपणाची वक्रदृष्टी कायम ठेवली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे कडवंची येथील ७०० एकरांवरील बागांच्या फवारणीसाठी शेतक-यांना दिवसाला १४ लाखांचा फटका बसत आहे.
जालना शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर कडवंची (ता. जालना) गाव आहे. येथे पाण्याचा ताळेबंद बांधून ऐन दुष्काळातही शेतक-यांनी शेकडो एकर जमीन ओलिताखाली आणलेली आहे. या परिसरात ७०० एकर क्षेत्रावर द्राक्षबागांची लागवड केलेली आहे. २०१२ मध्ये साडेतीनशे, २०१३ मध्ये अडीचशे एकर आणि या वर्षीच्या बागांची संख्या ही सातशे एकरांवर पोहोचली आहे. बागांची छाटणी झाल्यानंतर त्यापासून दीडशे दिवस पुढे शेतक-यांना काळजी घ्यावी लागते. या गावातील २०० एकरांवरील द्राक्षबागेने ६० दिवस पूर्ण केले असून माल बाजारात येण्यासाठी अजून त्यांना तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, तर ५०० एकरांवरील बागेने ३० दिवस पूर्ण केले आहेत. यासाठी सरासरी सव्वा लाखाचा खर्च शेतक-यांना अपेक्षित आहे. मात्र, दोन दिवसांपासून वातावरण बदलत असून डावणी, करपा, भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी बागांवर दिवसाला एकरी दोन हजारांचा फवारणी खर्च करावा लागत आहे. कामगारांचा तीन महिन्यांचा एकरी २० हजार रुपयांचा खर्च होत आहे. काही दिवस असेच वातावरण राहिल्यास उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता शेतक-यांनी वर्तवली आहे.
असे घटले उत्पादन
तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील शेतक-यांनी २०१२ मध्ये १२ कोटी रुपयांचे उत्पन्न घेतले होते. २०१३ मध्ये गारपीट आणि वादळी वा-यांमुळे यामध्ये ५० टक्क्यांनी घट झाली होती, तर या वर्षी १५ कोटींचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. मात्र, वातावरणाने खोडा घातला आहे.
पाण्याचे योग्य नियोजन
या गावाने इंडो-जर्मन तंत्रज्ञान, शासन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम राबवला आहे. ३२५ शेततळी शेतक-यांच्या शेतात आहेत. यामुळे शेतात मुबलक पाणी उपलब्ध असले तरी पाण्याचा वापर १०० टक्के ठिबक सिंचनातून काटेकोरपणे केला जातो आहे.
रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्याने द्राक्षबागांना मोठा फटका बसत आहे. अशा वातावरणामुळे खर्च वाढत चालला आहे.
चंद्रकांत क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कडवंची.
जानेवारी, फेब्रुवारीत गारपिटीची शक्यता
दीड महिन्यापूर्वी अमेरिकेत तुफान बर्फवृष्टी झाली. एका वर्षात तिथे जेवढा बर्फ पडतो तेवढा अवघ्या तीन दिवसांत पडला. सहा फूट बर्फाच्या खचात ५० टक्के अमेरिका दबली गेली. बर्फवृष्टी व हिमवादळामुळे निर्माण झालेले थंड हवेचे प्रवाह पूर्वेकडे सरकत गेल्यानंतर जेट स्ट्रीम इफेक्टद्वारे (अति वेगवान प्रवाह) ते हिमालयाच्या उत्तरेकडून वाहत गेलेले दिसून येतात. तथापि, या वेळी भारताच्या उत्तरेकडेही मोठ्या प्रमाणात
हिमवृष्टी सुरू असून थंड वा-याचे प्रवाह दक्षिणेकडे सरकत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशात गारपीट व वादळे होत आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानातून येणारे थंड वारे या हवेच्या प्रवाहाला अतिशय थंड करीत असल्याने गारपिटीत भर पडत आहे. ही परिस्थिती पाहता जानेवारी व फेब्रुवारीतही गारपिटीला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवली आहे.
‘भुरी, डाउनी’ने द्राक्षबागायतदार धास्तावले
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाच्या चक्रव्यूहाला भेदत कसेबसे सावरलेल्या द्राक्षबागांवर अचानक आलेल्या ढगाळ वातावरणाने संकट ओढवले आहे. भुरी व डाउनीचा प्रादुर्भाव होणार असल्याने द्राक्षबागायतदार धास्तावले आहेत. प्रादुर्भावाची तीव्रता अधिक झाल्यास उत्पादनालाही फटका बसणार असून निर्यातक्षम फळांवरही प्रश्नचिन्ह येणार आहे.
जिल्ह्यात सध्या ८०० एकर द्राक्षबागा आहेत. त्याचे संगोपन योग्य झाल्याने फळेही चांगली लगडली आहेत. अनेक बागांना पाणी कमी पडत असल्याने शेतकरी टँकरने पाणी आणून त्या जगवत आहेत.
बहरातील या बागांना अवकाळी पाऊस व विषम वातावरणाची बाधा न झाल्यास चांगले उत्पन्न हाती पडणार होते. परंतु शुक्रवारी वातावरणात बदल झाला असल्याने डाउनी व भुरीचा प्रादुर्भाव होणार आहे. अशा वातावरणामुळे द्राक्षघडांमध्ये पाणी जाऊन त्यावर बुरशी वाढते व घड गळतात. फळांची गुणवत्ता घसरते. निर्यातीवर विपरीत परिणाम होतो. दोन ते तीन दिवस असेच वातावरण राहिले तर उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येईल. अधिक काळ ते राहिले तर नुकसान अधिक होईल, असे तळणीचे द्राक्षोत्पादक शेतकरी तथा निर्यातदार तुकाराम येलाले यांनी सांगितले. या वर्षी लातूर जिल्ह्यातून परदेशात ६० ते ६५ कंटेनरची निर्यात होण्याची शक्यता आहे. तथापि, अशा वातावरणाला बागा बळी पडल्या तर जेमतेम १५ ते २० कंटेनरची निर्यात शक्य होईल, असेही येलाले म्हणाले.