आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२ हजार हेक्टर पिकणार सोन्यावाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - माळीवाडगाव आणि डोणगाव येथील दोन नद्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणाचे काम एकूण १३ किलोमीटर लांबीचे व ३० ते ४० फूट खोलीकरण स्वखर्चातून केल्यामुळे आज दोन्ही नद्या तुडुंब भरल्या आहेत. या पाण्यामुळे सुमारे दोन हजार हेक्टर जमिनीचे शेतशिवार ओलिताखाली येणार असून परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. विशेष म्हणजे हे गाव जलयुक्त शिवार योजनेत नसताना एवढे काम झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्रामस्थांनी आपल्याला निवडून दिल्याने त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गावासाठी हे काम करणे गरजेचे होते, असे डोणगावकर यांनी सांगितले.

सावंगी गटाचे जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटील डोणगावकर यांनी स्वखर्चाने सर्कल दुष्काळमुक्त व्हावे, या उद्देशाने प्रायोगिक तत्त्वावर डोणगाव येथे गेल्या दोन वर्षांपासून तर चालू वर्षी माळीवाडगाव येथील नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आजघडीला डोणगाव येथील मार्तंडी नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सात किलोमीटर अंतरापर्यंत तसेच माळीवाडगाव येथील वळीच्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम जवळपास सहा किलोमीटर अंतरावर करण्यात आलेले आहे. दोन्ही नद्यांची खोली तीस ते चाळीस फूट व रुंदी सुमारे ७५ ते शंभर फूट इतकी आहे. आज रोजी दोन्ही गावांच्या नद्या प्रारंभीच्या पावसाने तुडुंब भरल्याने नदीच्या एक-एक किलोमीटर अंतरावरील दोन्ही बाजूंच्या शेतकर्‍यांच्या सुमारे दोन हजार हेक्टर जमिनीचे शेतशिवार ओलिताखाली येणार आहे. यामुळे परिसरातील विहिरी, बोअर, हातपंपाला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दोन्ही गावांच्या नद्यांची प्रत्यक्ष पाहणी करून जलयुक्त शिवार योजनेच्या कामापेक्षा युद्धपातळीवर काम चालल्याने समाधान व्यक्त केले होते, तसेच लोकसहभागातून अशा कामाला वाव मिळाल्यास भविष्यात नक्कीच पाणीटंचाईवर मात होईल. चांगली कामे करणार्‍या गावांची देखील जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

डोणगवात सतराशे हेक्टर शेतशिवार
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावांतील जवळपास तीन हजार एकरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येईल, असे ग्रामस्थांचे अनुमान आहे. सध्या नदीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आताच शेतकर्‍यांना मोठा फायदा मिळत आहे. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सतराशे हेक्टर जमिनीचे शेतशिवार डोणगाव येथेच आहेत. शासनाकडून दुष्काळमुक्त सर्कल करण्याच्या कामाला विविध योजनेतून मदत मिळाल्यास कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटील डोणगावकर यांनी व्यक्त केली.

वाहून जाणार्‍या पाण्याला अडवले
सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे वांधे ज्या ठिकाणी होत असे, त्या ठिकाणी शेतीसाठी पाणी कुठून मिळणार? अशी परिस्थिती असल्याने यावर मात करण्यासाठी शेत शिवारातून वाहून जाणार्‍या पाण्याला अडवून जिरवायला हवे. असे लक्षात आल्याने गाव शिवारातून वाहत जाणार्‍या मार्तंडे नदी व माळीवाडगाव येथील नदीच्या "वाहून जाणार्‍या पाण्याला गाव बंदी’ प्रकल्पाला गेल्या वर्षीपासून संभाजी पाटील डोणगावकर यांनी स्वखर्चाने सुरुवात केलेली आहे. गेल्या वर्षी झालेल्या नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामात आठ ते दहा सिमेंट बंधारे बांधण्यात आलेले असून आणखी सिमेंट बंधार्‍याची गरज आहे. नियोजित अंतराचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे.

दोन-तीन वर्षांपासून जिल्हा परिषद सर्कल टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने डोणगाव आणि माळीवाडगाव येथील नद्यांचे प्रायोगिक तत्त्वावर खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. आज या झालेल्या कामामुळे नद्यांमध्ये तुडुंब पाणी साचले आहे. याचा फायदा अनेक शेतकर्‍यांना होणार असून गावातील पाणीटंचाईवर मात होईल. शासनाकडून दुष्काळमुक्त सर्कल करण्याच्या कामाला विविध योजनेतून मदत मिळाल्यास कामाला गती मिळेल - संभाजी डोणगावकर, जिल्हा परिषद सदस्य

डोणगाव येथील मार्तंडी नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे नदी तुडुंब भरल्याने आमच्या दोन्ही विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे याचा नेहमीच फायदा शेती उत्पन्नासाठी होईल. शेतकर्‍यांसाठी संभाजी पाटील डोणगावकर यांनी स्वखर्चाने केलेले काम फायद्याचे ठरणार आहे. - प्रल्हाद कुकलारे, शेतकरी डोणगाव

मला जसे समजते तेव्हापासून या मार्तंडी नदीचे पाणी आल्यासरशी वाहून जायचे, परंतु आज नदी भरली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या फायद्याबरोबरच गावातील पाणीटंचाईवर मात होईल. - आसाराम खोकड, शेतकरी
बातम्या आणखी आहेत...