आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळेगावच्या जुई नदीला पूर; दमदार पावसाने बळीराजा सुखावला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा- रविवारच्या अवकाळी आणि वादळी पावसानंतर सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वदूर कोसळलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, पेरणीसाठी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. दरम्यान, गोळेगाव येथील जुई नदीला प्रथमच पूर आला तर अजिंठ्यातील खारीबारव ओव्हरफ्लो झाला.

अजिंठ्यातील खारी बारव ओव्हरफ्लो
सलग दोन रात्री झालेल्या दमदार पावसामुळे सरायजवळील खारी बारव तुडुंब भरून वाहिली. बारवेतील पाणी रस्त्यावरून वाहिल्याने रस्ता ओलांडताना ग्रामस्थांना कसरत करावी लागली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन तास हा मार्ग ग्रामस्थांसाठी बंद करण्यात आला होता. अजिंठा गावातील सरायजवळ प्राचीन बारव आहे. या ठिकाणाहून सरायजवळील वस्तीस पाणी दिले जात होते. मात्र, अंधारी प्रकल्पातून गावाला पाणीपुरवठा सुरू होताच याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सध्या बारवेत कचरा टाकला जात असून सोमवार व मंगळवारी झालेल्या पावसाने ही बारव तुडुंब भरून वाहिली. ग्रामपंचायतीने नाला साफ करून पाणी काढून दिले.

दमदार पावसाने बळीराजा सुखावला
पैठण- राज्यासह मराठवाड्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून यावर्षी तरी पाऊस चांगला पडेल, या आशेने शेतकरीवर्ग सध्या शेत मशागतीशिवाय बी-बियाण्यांच्या खरेदीचे नियोजन करत असल्याचे दिसत आहे.

यंदा पाऊस समाधानकारक राहील, असे हवामान विभागाने सांगितले असले तरी या अंदाजावर शेतकरी अवलंबून राहतील असे नाही. त्यामुळे यावर्षी कपाशी लागवडीचे क्षेत्र निम्म्यावर येणार, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

बाजरीचे क्षेत्र वाढणार : मागील वर्षी न कापसाला भाव मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी कापसासारख्या नगदी पिकाकडे न वळता शेतकरीवर्ग यंदा बाजरीचे बियाणे खरेदी करताना दिसत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी 9 हजार हेक्टरवर असणारे बाजरीचे क्षेत्र यावर्षी 18 हजार हेक्टरवर जाईल, तर कपाशीची लागवड गेल्यावर्षी 25 हजार हेक्टरपेक्षा जास्त होती, ती यंदा घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, पाऊस किती प्रमाणात पडेल यावर पुढील गणित ठरणार असल्याचे कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन यांनी सांगितले.

12 घरांवरील पत्रे उडाले
बाजारसावंगी ।परिसरातील गधेश्वर येथे रविवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाºयासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे 12 जणांच्या घरावरील पत्रे उडून गेले. अनेकांच्या घरांवरील छत उडाल्याने घरात असलेले संसारोपयोगी सामान पावसाने भिजले आहे, तर दोन बालके किरकोळ जखमी झाली आहेत. या नुकसानीचा पंचनामा तलाठी भिंगारे यांनी केला आहे. या वेळी सरपंच भीमराव नलावडे यांनी नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याचे वृत्त आहे. गुरुवारीही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी बी-बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे.

सिल्लोड तालुक्यात दिलासा
सिल्लोड तालुक्यात रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरू असून दोन दिवसांत सर्व सर्कलमध्ये एकूण 161 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने गोळेगावच्या जुई नदीला पूर आला.
पावसाच्या चिंतेत असणाºया शेतकर्‍यांना दोन दिवसांपासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मागच्या हंगामात झालेल्या अत्यल्प पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. मात्र, सात जूनपासून चांगल्या पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज असताना दोन जूनपासूनच पाऊस सुरू झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. सोसाट्याच्या वाºयासह शनिवारी तालुक्यात सर्वत्र कमीअधिक प्रमाणात पावसाच्या सरी पडल्या. तर रविवार व सोमवारी दमदार पाऊस झाल्याने रखरखीत उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मागच्या हंगामात अत्यल्प पावसामुळे जमिनीची भूक भागलेली नव्हती व कडक उन्हाळ्यामुळे भूक भागण्यास वेळ लागण्याचा कयास होता. परंतु सुरुवातीलाच दोन्ही दिवस भिज पाऊस झाल्याने पाणी पूर्णपणे जमिनीत मुरल्याने फायदा झाला. गोळेगाव परिसरात असलेल्या जुई नदीला तीन वर्षांत पहिल्यांदाच पाणी
आले.त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना आश्चर्य वाटले.