आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड- तालुक्यात रविवारी रात्री वादळी वा-यासह रोहिण्यांचा जोरदार पाऊस बरसला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पावसामुळे अंधानेर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या छतावरील पत्रे उडून ते शाळेच्या मैदानात पडले. शहरात एका ठिकाणी लिंबाचे झाड उन्मळून पडले.

शाळेची इमारत धोकादायक
अंधानेर येथील जिल्हा परिषद हायस्कूलची इमारत 1962 मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीला 50 वर्षे उलटून गेली आहेत. शाळेच्या भिंतीची डागडुजी न केल्यामुळे भिंतीला तडे गेले आहेत. या ठिकाणी पूर्वी उर्दू माध्यमासह मराठी माध्यमाचे प्राथमिक, माध्यमिक वर्ग भरवले जात होते. आता येथे पाचवी ते दहावीचे वर्ग भरवले जात आहेत. या भिंतीला तडे गेल्याने इमारत धोकादायक बनली आहे. लाकडी बीमही वाºयाच्या तडाख्याने कधीही तुटू शकते. पावसाने या शाळेच्या भिंतीवरील पत्रे उडून शाळेच्या मैदानातच पडले. मात्र, ही पत्रे ज्या वेळी उडाले त्या वेळी झालेल्या आवाजाने आसपासचे नागरिक भयभीत झाले होते.

मोठा अनर्थ टळला
सध्या शाळेला सुट्या आहेत. रविवारी रात्री वादळी पावसाने हजेरी लावल्याने पत्रे उडून पडले आहेत. शाळेच्या मैदानात मुले दुपारच्या वेळी खेळ खेळतात. मात्र, ही घटना दुपारी घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. त्यातच शाळेची इमारत ही जर्जर झाली आहे. त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती किंवा नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पाचोड येथे ढाब्याची भिंत कोसळून 2 गंभीर
पैठण तालुक्यातील पाचोड येथे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धुवाधार पावसाने हजेरी लावली. हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळील साई ढाब्याची भिंत कोसळून 3 जण जखमी झाले. त्यात दोघांची प्रकृती गंभीर आहे. दोन तास पावसाने परिसराला झोडपून काढले. यामध्ये मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. ढाब्याची भिंत पडून अशोक पडुळे (45, लिमगाव, ता. पैठण), ढाबामालक अशोक औटे (25) हे गंभीर जखमी, तर हर्षद बाबुलाल औटे (18, दोघे रा. जालना) याला किरकोळ मार लागला. त्यांच्यावर पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घाटीत हलवण्यात आले.

सोयगावला मुसळधार
सोयगाव- तालुक्यात रविवारी रात्री तासभर सर्वदूर वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक सोयगाव सर्कलमध्ये 37 मिमी पावसाची नोंद झाल्याचे पेशकार व्ही. टी. जाधव यांनी सांगितले. सोयगाव तालुक्याला काल रात्री आठ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. सोयगावला 37.6 मिमी, सावळदबारा 5 मिमी, बनोटी 12 मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्यात सरासरी 18 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अजिंठा । मुसळधार पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली. चाळीसगाव राज्य मार्ग काही वेळासाठी बंद करण्यात आला होता. फर्दापूर, अजिंठा लेणीचा वीजपुरवठा 23 तास बंद होता.

गंगापूरमध्ये समाधान
गंगापूर तालुक्यात रविवारी रात्री सुमारे दीड तास रोहिण्या बरसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून बी-बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्राच्या दुकानांसमोर सोमवारी दिवसभर शेतकर्‍यांनी गर्दी केली होती. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व उकाड्यामुळे पावसाचे वातावरण तयार झाल्याचे जाणवत होते. रविवार, 2 जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गंगापूर शहर व तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री बारा वाजेपर्यंत हा पाऊस पडला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.