आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोडा दिलासा : लासूर, खुलताबादेत पाऊस आला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - महिनाभरापासून लांबलेल्या पावसाने बुधवारी लासूर स्टेशन, माळीवाडगाव, शिल्लेगाव, सावंगी, गाजगाव, खादगावसह परिसरात चारच्या सुमारास हजेरी लावल्याने चिंताग्रस्त शेतकर्‍यांचा जीव भांड्यात पडला. माळीवाडगाव परिसरात जोरदार पावसामुळे नदीला प्रथमच पाणी वाहिल्याने येथील शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण होते.

लासूर स्टेशन परिसरात मोठा पाऊस नसला तरी पावसाच्या शिडकाव्याने परिसरात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळपासून परिसरात ढगाळ वातावरण होते.

दुपारी चारच्या सुमारास पावासाने तास-दीड तास हजेरी लावल्याने शेतकर्‍यांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस पडल्यास पेरण्या सुरू होतील, अशी आशा शेतकर्‍यांमध्ये आजच्या पावसाने निर्माण झाली आहे. गंगापूर तालुक्यातील काही गावांना आजच्या पावसाने दिलासा दिला.

खुलताबादेत हलका पाऊस
अनेक दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या खुलताबाद तालुक्यातील बळीराजाला बुधवारी पावसाने थोडा दिलासा दिला. बुधवारी सकाळपासून पावसाचे वातावरण तयार झाले व अकरा वाजता पावसाने हजेरी लावली. खुलताबाद शहरासह खर्डी, सालुखेडा, सराई-भडजी, कसाबखेडा, वेरूळ, गोळेगाव, मावसाळा, नंद्राबाद येथे रिमझिम पाऊस झाला. सायंकाळी पुन्हा आकाशात ढग जमा झाले व काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. यापुढे मोठा पाऊस पडेल अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. पाऊस पडेल या आशेवर लागवड केलेल्या पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून औरंगाबाद तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.

(फोटो - लासूर स्टेशन परिसरात बुधवारी दुपारी तासभर पाऊस पडला. यामुळे वातावरणात बदल झाला. माळीवाडगाव परिसरातील नदीला पहिल्यांदाच पूर आला. यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे.)