आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना, नांदेडमध्ये पावसाची हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालन्यासह मंठा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी, तर भोकरदन येथे पहाटे पाच वाजेदरम्यान पाऊस झाला. दरम्यान, माळशेंद्रा शिवारात झालेल्या वादळी पावसाने आंबा, डाळिंब, सीताफळ, मोसंबी बागांचे नुकसान झाले.

पाचोड - पाचोड परिसरातील कोळी बोडखा, मुरमा, थेरगाव, लिंबगाव येथे शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्यांना पावसामुळे दिलासा मिळाला. उन्हाळी पिकांवर याचा परिणाम होईल, असा शेतकर्‍यांचा अंदाज आहे.

लाडसावंगी - लाडसावंगीसह परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस पडला. यामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच बीजोत्पादन कांद्याच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांच्या अंतराने पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.

नांदेड - शुक्रवारी पहाटे पावणेतीन ते साडेचारच्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. शहरात 12 मिमी पावसाची नोंद झाली. वादळी पावसाने शहरातील सखल भागात अनेक ठिकाणी डबकी साचली. मध्य भारतात काही दिवसांपासून दुपारनंतर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात पाऊस होत आहे, असे एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक र्शीनिवास औंधकर यांनी सांगितले. पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली. गुरुवारी कमाल तापमान 41.9 सेल्सियस होते. ते शुक्रवारी 37.8 सेल्सियसपर्यंत घसरले. किमान तापमानही 25.6 वरून 20.2 सेल्सियसपर्यंत घसरले.

वीज पडून दोघींचा मृत्यू
परंडा / कळंब - उस्मानाबाद जिल्ह्याला शुक्रवारी दुपारी पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळल्याने महिलेसह लहान मुलीचा मृत्यू झाला. अन्य एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटना कळंब तालुक्यातील इटकूर व परंडा तालुक्यातील शिराळा शिवारात घडल्या. शिराळा येथील घटनेत, गिलबिले कुटुंब गवारीच्या शेंगा काढण्यासाठी शेतात गेले होते. शेंगा काढण्याचे काम सुरू असताना वादळी पाऊस सुरू झाल्याने रेखा सचिन गिलबिले, राधा सचिन गिलबिले, सचिन गिलबिले हे जांभळीच्या झाडाखाली आडोशाला उभे होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास वीज कोसळल्याने यामध्ये राधा गिलबिले (11) ही मुलगी व तिची आई रेखा गिलबिले गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यक ीय अधिकार्‍यांनी राधा या मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच रेखा गिलबिले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बार्शी येथे पाठवण्यात आले होते.