जालना- जिल्ह्यात दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने सर्वदूर दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणार अाहे. तर रबी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त मानला जातो आहे. पोळा सण दिवसांवर आला असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी ३३ ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. १७ जुलै रोजी बहुतांश भागात पाऊस झाला होता. शनिवारी सर्वदूर पाऊस झाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या वेळेत पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप धाेक्यात आला होता. यात मूग, उडीद या पिकांना सर्वाधिक फटका बसला अाहे. त्यापाठोपाठ जिरायती क्षेत्रावरील मका, बाजरी, सोयाबीन हे पिके सुकली होती. तूर आणि कपाशी मात्र काही प्रमाणात तग धरुन आहेत. हवामान खात्याने मराठवाड्यात १९ ते २३ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होईल असा अंदाज वर्तवला होता. माेठ्या विश्रांतीनंतर पावसाची चिन्ह दिसत असल्याने शेतकरी आनंदात होते. जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद नाही. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. भोकरदन, जालना, बदनापूर तालुक्याच्या काही ठिकाणी जोरदार, तर बहुतांश भागात पावसाची संततधार सुरु होती. जालना शहर,परिसरात सायंकाळी चांगला पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी ओढ्यांना पाणी आले तर शेतांमध्येही पाणी साचले आहे.
रब्बीसाठी उपयुक्त
पावसाचा मोठा खंड पडल्याने मूग, उडीद ही पिके केवळ १५ ते २० टक्केच हाती येतील. मात्र सोयाबीन, कपाशी तुरीसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. पुढील दीड महिन्यात आणखी चांगला पाऊस झाला तर रब्बी हंगामासाठी तो उपयुक्त ठरेल अशी माहिती खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ पंडित वासरे यांनी दिली.
केवळ ३५ टक्के पाऊस
आजपर्यंत ३७८ मिमी पाऊस अपेक्षित होता. त्या तुलनेत २५१ मिमी पाऊस झाला. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या केवळ ३५ टक्के आह.आजपर्यंत सरासरीच्या ५९ टक्के आहे. पावसाने ३० ते ३५ दिवसांपासून दडी मारल्याने नुकसान झाले. शुक्रवारी अंबड, घनसावंगी तालुक्यात पाऊस झाला. शनिवारी सर्वदूर पाऊस झाला.
गेली ३० ते ३५ दिवसांपासून दडी मारल्यानंतर शनिवारी पुन्हा पाऊस सुरू झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यातील सोयाबीन, मका, बाजरी या पिकांसह कडधान्याची पिके गेली आहेत. तर कपाशीची वाढ खुंटली आहे. दरम्यान शनिवारी शहरासह तालुक्यातील धावडा, पिंपळगाव, आन्वा, भोकरदन, सिपोरा, राजूर, केदारखेडा, हसनाबाद या आठही मंडळांत पावसाला सुरुवात झाली. काही भागात मध्यम तर कुठे जोरदार पाऊस झाला. यामुळे रबी हंगामाच्या अाशा पल्लवित झाल्या आहेत.