आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसिंचन: वरुणराजाची कृपादृष्टी भिंगीतील चार बंधारे तुडुंब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडाळा- खंडाळा सर्कलमध्ये रोहिणी नक्षत्रातील सुमारे पाच दिवसांपासूनच्या सलग पावसामुळे भिंगी गावातील चार साखळी बंधारे तुडुंब भरले असून अवर्षणाचा मोठा फटका सहन करणार्‍या गावास या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे.

वैजापूर तालुक्याला यावर्षी दुष्काळाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. भिंगी गावही त्यास अपवाद नव्हते. दुष्काळावर मात करण्यासाठी सन 2012 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत गावानजीकच्या नदीवर सिमेंटचे चार साखळी बंधारे उभारण्यात आले होते. रोहिणी नक्षत्रातील पहिल्याच पावसात हे साखळी बंधारे तुडुंब भरले असून नऊ टीएमसी पाणीसाठवण करण्याची या बंधार्‍यांची क्षमता आहे.

दुष्काळाच्या छायेत वावरलेल्या भिंगी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. गुरांच्या चारा-पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून परिसरातील विहिरी अधिग्रहित करून गावास पाणीपुरवठा करावा किंवा टँकर सुरू करावे, अशी ग्रामस्थांची ओरड होती. या पार्श्वभूमीवर दै. ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत भिंगी गावासाठी टँकरही सुरू झाले. त्यामुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता. मात्र, गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम होता. नागरिकही आसपासच्या परिसरातून पाणी आणून आपली तृष्णा भागवत होते.

तालुक्यातील दुष्काळाची दाहकता पाहता भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत चार सिमेंट साखळी बंधारे भिंगी गावानजीक उभारण्यात आले होते. पाच दिवसांपासून रोहिणी नक्षत्राच्या दमदार पावसाने हे साखळी बंधारे भरल्याने गावातील टंचाई निवारणास त्यांचा मोठा आधार होणार आहे.

नऊ टीएमसी क्षमता
या चारही सिमेंट बंधार्‍यांची नऊ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असून त्यांची लांबी 30 मीटर व रुंदी दीड मीटर आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन 2012 मध्ये या बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली होती. रोहिणी नक्षत्रातील दमदार पावसामुळे हे बंधारे तुडुंब भरले आहेत.

पाण्याचा प्रश्न मिटला
पहिल्याच नक्षत्रात गावातील साखळी बंधारे भरल्याने विशेषता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. बंधार्‍यातील साठवणीमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. येणार्‍या दिवसांत बंधार्‍यामुळे हजारो हेक्टर शेतीला याचा लाभ होईल.
-एन. आर. पानपाटील, ग्रामसेवक

भटकंती थांबली; गावात आनंद
रोहिणी नक्षत्र चांगले असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. पावसास सुरुवात झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.
- शिवाजी घायवट, ग्रामस्थ