आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासूरमध्ये दमदार; पेरण्यांना सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव, लासूर स्टेशन, सावंगी, गवळीशिवरा, फुलशेवरा, माधववाडीसह काही ठरावीक गावांना बुधवारी दमदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या अशा पल्लवित होत गुरुवारी सकाळपासूनच शेतीशिवारात शेतकर्‍यांनी कपाशी, अद्रक, मका लागवड व पेरणीची सुरुवात केल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून आले. गुरुवारी दुपारनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागलेले होते. शेतीची मशागत, रासायनिक खते, बी-बियाण्यांची जमवाजमव करून महिना उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने पेरण्या, लागवडी खोळंबल्या होत्या. मात्र, बुधवारी झालेला पाऊस काही मोजक्याच गावांसाठी वरदान ठरला. त्यामुळे येथील शेतकर्‍यांनी लागवडी, पेरण्या सुरू केल्या. त्यातदेखील म्हणावा तसा वाफशाचा पाऊस पडला नाही, परंतु आता येथून पुढे पाऊस पडेल या अपेक्षेने त्यांनी मोठय़ा हिमतीने पेरण्यांची सुरुवात केली. गुरुवारी दिवसभर शेतकरी कुंटुबीयांसवे शेतीकामातच मग्न होते. कोठे अद्रक, कपाशी, मका, तर कोठे सेंद्रिय खते टाकण्याचे काम मोठय़ा प्रमाणात चालू होते. काही शेतकरी सरी पाडून नांगरणीच्या शेतीची मशागत करताना दिसून आले.

पाऊस पडल्याने लासूर स्टेशनच्या बाजारपेठेत रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी गुरुवारी शेतकर्‍यांची गर्दी दिसून आली. यातच पुन्हा गुरुवारी दुपारनंतर पावसाचे आगमन झाल्याने शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठेतील व्यापार्‍यांसह इतर व्यावसायिकांच्या चेहर्‍यावरही समाधानाचे भाव दिसून आले.

(फोटो - लासूर परिसरात शेतात पाणी)