आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग दुसर्‍या दिवशीही मराठवाड्यात अवकाळी पाऊस; शाळेवरील छत उडाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - वादळाच्या तडाख्यात शाळेवरील छत उडून गेल्याची घटना पाटोदा तालुक्यातील वाघिरा गावाजवळ बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. दुर्घटनेपूर्वीच शाळा सुटल्याने विद्यार्थी बचावले. ईश्वर भारती माध्यमिक विद्यालयात ही दुर्घटना घडली.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास केजला गारपीट झाली. वीस मिनिटे वादळी पाऊस कोसळला. विडा, येवता, नागझरी, आडस, चंदनसावरगाव मस्साजोग या परिसरांत गारांचा पाऊस झाला.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात तिसर्‍या दिवशीही वादळी पावसाने झोडपले. वडोदबाजार, लासूर स्टेशन, सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे पाऊस झाला. अन्य भागांतही ढगाळ वातावरण होते.

लातूर जिल्ह्यात गारांचा पाऊस : जिल्ह्यातील रेणापूर व अहमदपूर तालुक्यांत गुरुवारी सायंकाळी गारांचा पाऊस झाला. आंबा व द्राक्षबागांना त्याची अधिक झळ बसली. इतर तालुक्यांतही पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे हरभरा, गव्हाच्या राशी तसेच उसाची गुर्‍हाळे खोळंबली. सुमारे 60 एकरवरील द्राक्षबागांना झळ पोहोचली आहे. घडात पाणी शिरल्याने बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे रेणापूरचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव व मंडळ कृषी अधिकारी भिसे यांनी सांगितले.

हिंगोलीत जोरदार
सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास शहरासह परिसरात जोरदार गारपीट झाली. रस्त्यांवर सर्वत्र गारांचा खच साचला होता. सुमारे दहा मिनिटे गारपीट झाल्यानंतर जोरदार पाऊस झाला. शहराशिवाय रिधोरा, नर्सी नामदेव, खानापूर चित्ता आदी भागांतही गारपीट झाली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गारांच्या पावसामुळे झाडांची पाने झडून गेल्याने झाडांखाली पानांचा खच दिसून येत होता.

जालन्यात दुसर्‍या दिवशीही गारपीट
जालना, भोकरदन, अंबड आणि मंठा तालुक्यांतील काही भागांत गारपिटीसह तासभर पाऊस कोसळला. गुरुवारी दुपारी तीन वाजता पावसास सुरुवात झाली. सलग दुसर्‍या दिवशीही कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, कांदासह डाळिंब, आंबा, द्राक्ष, केळी बागांचे मोठे नुकसान झाले. सिंगोना येथे झाड पडल्याने शाळेवरील छत कोसळले.

नांदेडमध्ये वादळी
नांदेड नरसी, नायगाव व बिलोलीसह तेलंगणच्या सीमावर्ती भागात गुरुवारी दुपारनंतर वादळी पावसाने हजेरी लावली. नायगाव येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. जवळपास अर्धातास पावसाने शहराला झोडपून काढले. नरसी येथे दुपारी तीन-साडेतीनच्या सुमाराला वादळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी उशिरापर्यंत या भागात पावसाची रिपरिप सुरूच होती.