आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदीर्घ विश्रांतीनंतर मराठवाड्यातील बहुतांश भागात पाऊस; वीज पडून दोन ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्‍मानाबाद शहरातील जलमय झालेले रस्‍ते. - Divya Marathi
उस्‍मानाबाद शहरातील जलमय झालेले रस्‍ते.
औरंगाबाद - प्रदीर्घ विश्रांतीनंतर मराठवाड्यातील बहुतांश भागात वरुणराजाने समाधानकारक हजेरी लावली. परभणीत मुसळधार, उस्मानाबादेत धो धो तर नांदेडात दमदार पाऊस कोसळला. जालना, लातुरातही पावसाने हजेरी लावल्याने पिकांना दिलासा मिळाला. जालना शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. दरम्‍यान, उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात वीज पडून दोन जण ठार झाले तर माजलगाव तालुक्‍यात एका शेतकऱ्याचा सात एकरातील ऊस जळाला.
लातूर जिल्ह्यात रिमझिम
प्रदीर्घ विश्रांतीनंतर सोमवारी वरुणराजाने जिल्ह्यात कुठे बरी तर कुठे रिमझिम रूपात हजेरी लावली. दुपारी दोनपासून पाऊस बरसत राहिला. रेणापूर, शिरूर अनंतपाळ, निलंगा, किनगाव येथे बरा पाऊस झाला. चाकूर, उदगीर, औसा, अहमदपूर, मुरूड येथे हलका पाऊस झाला.
परभणीत मुसळधार
शहरासह परिसरात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. या वर्षीचा सर्वाधिक जोरदार पाऊस असल्याचे दिसून आले. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७७५ मिलिमीटर असून या वर्षी आतापर्यंत केवळ २८ टक्केच पाऊस झालेला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती अत्यंत वाईट असून जूनच्या १८ तारखेनंतर गायब झालेल्या पावसाने संपूर्ण जुलै महिनाभर खंड दिला. तब्बल दीड महिन्याची तूट निर्माण झाल्याने पहिल्या पेरणीच्या पिकांची वाढ खुंटली. बऱ्याच ठिकाणी तर पाळ्या घालण्याची वेळ आली. दुबार पेरणीचीही परिस्थिती ऑगस्टच्या पावसाने निर्माण केली नाही. ऑगस्टमध्येही जेमतेमच पाऊस झाला.
हिंगोलीत सर्वदूर संततधार
जिल्ह्यात सायंकाळी सहानंतर सुरू झालेल्या पावसाने हळूहळू जोर पकडून सर्वच भाग व्यापला. रात्री ८ च्या सुमारास शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाला. यामुळे जिल्हाभरातील पिकांना तूर्त जीवदान मिळाले.
नांदेडात अर्धा तास दमदार
नांदेड शहरात सोमवारी सायंकाळी साडेचार वा. दमदार हजेरी लावली. अर्धा तास दमदार पाऊस सुरू होता. त्यानंतरही पावसाची रिमझिम सुरू होती. नांदेड (१.६३), मुदखेड (७), कंधार (२.१७), लोहा (३.३३), किनवट (०.७१), माहूर (३४.७५), हदगाव (१२.७५), देगलूर (२१.८३), मुखेड (१७.२९ मि.मी) या तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.
दोन दिवसांत १०० मिमी पाऊस
उस्मानाबादेत दोन दिवसांत १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरातील रस्ते, जलमय झाले होते. त्याचबरोबर परिसरातील सारोळा, सांजा, दारफळ या भागातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोलीकरणातही मोठ्या प्रमाणात पाणी साचून ओव्हरफ्लो झाले होते. चौक जलमय झाले होते.
वीज पडून दोन ठार
- राहुल विश्वंभर जाधव (२५, रा. आनाळा, ता. परंडा), विमल धनसिंग राठोड (रा. जेवळी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) यांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला.
- माजलगावातील तालखेड येथे शेतकरी रामकिशन चांडक यांच्या शेतात वीज कोसळल्याने सात एकरातील ऊस जळाला. त्यांचे अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले.
-अंबाजोगाईत माजी मंत्री दिवंगत विमलताई मुंदडा यांच्या निवास्थानातील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने पेट घेतला. यात नुकसान काही झाले नाही.