आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीने द्राक्षबागांचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - बुधवारी रात्री तसेच गुरुवारी सकाळी जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाला असून, त्यामुळे द्राक्षासह आंब्याच्या बागेवर परिणाम झाला आहे. तसेच ज्वारीची लोळणही झाली आहे. या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांना काही प्रमाणात फायदा झाला आहे. दरम्यान, पावसाने हवामानात पुन्हा गारठा निर्माण झाला आहे.

उस्मानाबादसह तुळजापूर, कळंब, वाशी, भूम, परंडा, उमरगा आणि लोहारा तालुक्यात गुरुवारी पहाटे अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तुळजापूर, परंडा, वाशी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. पावसाने परंड्यात पाणीच पाणी झाले होते. तुळजापूरमध्येही अचानक आलेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले होते. तुळजापुरात सकाळी १० वाजेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. दिवसभर ढगाळ हवामान होते. त्यामुळे जिल्ह्याला सूर्यदर्शनही झाले नाही. बुधवारी रात्री झालेल्या पावसाची वाशी तालुक्यात १० मिलिमीटर इतकी नोंद झाली असून, पारा परिसरात गारपीट झाल्याने रब्बीच्या ज्वारीचे नुकसान झाले. परंड्यात सकाळी दमदार सरी बरसल्या, त्यामुळे पाण्याचे डोह साचले होते. तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा परिसरात द्राक्षबागांसह कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

२०१४ची पुनरावृत्ती?
चारवर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटाने ग्रासले आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी गारपीट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर टाच आणत आहे. गेल्या वर्षी(२०१४) फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात गारपीट होऊन रब्बी पिकांसह द्राक्षबागा, पपई, डाळिंब बागा, फुलशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसानीमुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत दिली होती. त्यानंतर मोसमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम वाया गेला. काही शेतकऱ्यांनी पुन्हा रब्बीवर भरवसा ठेवून मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. पिके काढणीला येण्यापूर्वी अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा बसल्यास पुन्हा नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
द्राक्ष बागायतदार धास्तावले
वर्षभरजोपासलेल्या द्राक्षबागेवर अवकाळी पावसामुळे संकट कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत. काही भागात द्राक्षबागा तोडणीस आल्या आहेत. त्यामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
रब्बीला फायदा
सध्यापडत असलेला अवकाळी पाऊस रब्बीच्या पिकांना काही प्रमाणात फायदेशीर मानला जात आहे. ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस तूर्तास लाभदायक असला तरी काही भागात ज्वारीच्या कणसांमध्ये दाणे भरत असून, अशावेळी अवकाळीने नुकसान होण्याची भीती असते.
आंब्याचा मोहोर गळणार!
द्राक्षबागेसहडाळिंब, पपई आणि आंबा या फळांचा हंगाम सुरू होत आहे. गतवर्षी अवकाळी आणि गारपिटीमुळे या फळपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. सध्या आंब्याला मोहोर लगडला असून, गारपिटीच्या दणक्याने मोहोर गळण्याची भीती व्यक्त होत आहे.
नारंगवाडी @ १९ मिमी
बुधवारीरात्री उमरगा तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने रब्बीच्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, तालुक्यातील नारंगवाडी मंडळात सर्वाधिक १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कुठे फायदा तर कुठे नुकसान, असे चित्र आहे.