आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain In Marathwada, Farmers Loss News In Marathi

मराठवाड्यातील पाऊस, हवामान, रब्बीसाठी पोषक, कृषी विद्यापीठाचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- मागील काही दिवसांपासून राज्यात तसेच मराठवाड्यातील काही भागांत झालेल्या बेमोसमी पावसाने जमिनीतील ओलाव्यात वाढ झाल्याने हे वातावरण रब्बी हंगामासाठी पोषक ठरेल, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी व्यक्त केले आहे.
ज्या भागात जमिनीतील ओलाव्यात वाढ झाली, त्या भागात रब्बी हंगामातील गहू, करडई व हरभरा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. करडई हे पीक कमी पाण्यावर तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर घेऊन सद्य:स्थितीत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा करडईला फायदा होऊ शकतो. त्यासाठी परभणीच्या कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या करडईच्या
परभणी-१२ (परभणी कुसुम) व परभणी -४० या वाणांचा उशिरा पेरणीसाठी वापर करता येतो. कृषी विद्यापीठाकडे परभणी-१२ या करडईच्या सुधारित वाणाचे बियाणे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी या वाणाची पेरणी करावी व पडलेल्या पावसाचा फायदा घ्यावा, असेही आवाहन संशोधन संचालक डॉ.वासकर यांनी केले आहे.

कृषी विद्यापीठाच्या बीजोत्पादन केंद्रात हरभरा व गव्हाचे वाणही उपलब्ध
परभणी कुसुम या सत्यतादर्शक वाणाची पाच किलोग्रॅमच्या वजनाच्या बियाणाची किंमत ३७५ रुपये आहे. हरभरा पिकाचे आकाश व विजय या वाणाचे व गहू पिकाक लोकवन वाणाचे बियाणेही कृषी विद्यापीठाच्या बीजोत्पादन केंद्राकडे उपलब्ध आहे, अशी माहिती केंद्र अधिकारी एस.बी.घुगे यांनी दिली.

लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी योग्य
परभणी जिल्ह्याचे करडईचे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र १० हजार ९०० हेक्टर असून आतापर्यंत केवळ १२०० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हरभऱ्या बाबतीतही ५२ हजार ४०० हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य असून आतापर्यंत ११ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली आहे. परंतु मागील आठवड्यातील पावसाने या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत या दोन्ही पिकांची अशीच अवस्था आहे.

ओलावा वाढल्याने गहू, ज्वारीचीही पेरणी वाढेल
परभणी जिल्ह्यात गव्हाच्या लागवडीचे क्षेत्र ४३ हजार ३०० असून आतापर्यंत केवळ २७०० हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. रब्बी ज्वारीच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. एक लाख ६८ हजार लागवड क्षेत्र असताना ४२ हजार ६०० हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र, जमिनीतील ओलावा वाढल्याने या दोन्ही पिकांच्या लागवडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

खरिपाचे मोठे नुकसान
यावर्षी पावसाचे प्रमाण जिल्ह्यात सरासरी ४४ टक्केच राहिले आहे. त्यातही पावसाची अनियमितता राहिल्याने खरिपाच्या पिकांच्या उताऱ्यात मोठी घट झाली आहे. सर्वच तालुक्यांतील उत्पन्न ५० टक्क्यांच्याही खाली घसरले आहे. आणेवारीतून ही बाब समोर आलेली आहे. मूग, उडीद व सोयाबीनमधील ही घट शेतकऱ्यांना आर्थिक फटका देणारी ठरली. कापूस व तुरीतही घट असली तरी ती थोड्या फार प्रमाणात भरून निघेल.
-साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी