आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ तलाव तुडुंब; परभणी, जालना, बीड जिल्ह्यांतही वरुणराजा बरसला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथे झालेल्या पावसाने नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. छाया : आरीफ शेख - Divya Marathi
उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथे झालेल्या पावसाने नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. छाया : आरीफ शेख
उस्मानाबाद- गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ११ तलाव तुडुंब झाले आहेत. अनेक तलावांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याचा साठा झाला आहे. उस्मानाबादला पाणीपुरवठा करणारे तेरणा, रुईभर व शेकापूर तलावातही चांगला पाण्याचा साठा झाला आहे. मात्र, पूर्ण क्षमतेने सर्व तलाव भरण्यासाठी व पाणीटंचाईबाबत आश्वस्थ होण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे.दरम्यान, जालना, बीड, औरंगाबाद, परभणी जिल्ह्यांतही पाऊस झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये पाऊस झाला आहे. शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. शनिवारी शहरात दुपारी २० मीनिट पाऊस बरसला. दोन दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्यातील तलावांच्या पाणीपातळीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. मागे काही दिवस झालेल्या व आताच्या दोन दिवसांच्या पावसामुळे ११ तलाव तुडुंब भरले आहेत. तसेच अनेक तलावांमध्ये ८० टक्केपेक्षा अधिक पाणी साठले आहे. 

संगमेश्वर तलाव पूर्वीच तुडूंब झाला आहे. लघु प्रकल्पांपैकी बेडकीनाला, बेंबळी, राघुचीवाडी, वलगुड, अंबेजवळगा, खेड, शेकापूर, चोराखळी, आळणी येथील तलाव १०० टक्के भरले आहेत.  

मध्यम प्रकल्पांपैकी तेरणा प्रकल्पामध्ये ८५, रुईभर येथील तलावात ७० टक्के, बाणगंगा ८८, रामगंगा ४२, खासापूर ५३ टक्के पाणी आले आहे. अन्य मध्यम प्रकल्प ५० टक्क्यांच्या जवळपास आहेत. तसेच लोहारा तालुक्यातील निम्ण तेरणा प्रकल्पामध्ये ६०.२६१ तर कळंब तालुक्यातील 

मांजरा प्रकल्पामध्ये ५०.२३० टक्के पाणी 
आले आहे. जिल्ह्यात एकूण २१० तलाव आहेत. या तलावांमध्ये पाणी कमी आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरण्यासाठी अाणखी पावसाची गरज आहे.  उस्मानाबाद जिल्ह्याची सरासरी १६.९९ आहे. तर एकट्या उस्मानाबाद तालुक्याची सरासरी ४० मीलीमीटर आहे. याच तालुक्यातील शहर, बेंबळी, केशेगाव या तीन महसूल मंडलात अतिवृष्टी आहे. भूम तालुक्यातील वालवड येथेही अतिवृष्टी आहे.

नाव्होली प्रकल्प ओव्हरफ्लो
केज- शुक्रवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने केज तालुक्यातील जाधव जवळा, नाव्होली हे दोन्ही लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. शनिवारी सकाळी १३३.१८८ दलघमी पाणीसाठा झाला. तर मांजरा धरणाच्या पाणी साठ्यातही पाच टक्क्याने वाढ झाल्याने आता धरण ४९ टक्के भरले आहे.  

जिंतूर शहरामध्येच १०० मिलिमीटर पावसाची नोंद
परभणी- जिल्ह्यातील पाच तालुक्यांत चांगला पाऊस झाला. जिंतूर शहरातच १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत झालेल्या या पावसाची जिल्ह्याची सरासरी ३५.२१ मिलिमीटर आहे. परभणी शहरात रात्री रस्त्यांवरून ओसंडून पाणी वाहत होते. जिंतूर, परभणी, सोनपेठ, सेलू, मानवत या तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. 

ढेंगळी पिंपळगावात २० घरांत घुसले पाणी
सेलू- पावसामुळे लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातील पाणी लेंडी ओढ्यात आल्यामुळे ढेंगळी पिंपळगाव येथील वीस घरांत पाणी घुसल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. यातील चार घरांचे तर मोठे नुकसान झाले.   शुक्रवारी रात्री ९ वाजता सेलू शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे विद्युत पुरवठादेखील वारंवार खंडित होत होता. 
बातम्या आणखी आहेत...