आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पुन्हा पावसाची हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हजेरी लावलेल्या मुसळधार पावसाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस शनिवारी (दि. आठ) सायंकाळी पुन्हा जोरदार हजेरी लावली. सोमवारपासून (दि. एक) पावसाने खंड दिला होता. त्यामुळे जनजीवन सुरळीत झाले होते, तर शेतीच्या कामांच्याही हालचाली सुरू झाल्या होत्या.

श्रीगणेश विसर्जनाच्या दोन दिवस अगोदर व विसर्जनाच्या दिवशीही जोरदार हजेरी लावलेला पाऊस संपूर्ण पंधरवडाभर कोसळतच राहिला. या पावसाने प्रथमच नदी-नाल्यांना पूर आला तर सर्व प्रकल्प काठोकाठ भरले गेले. मात्र, शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सातत्याने पडणाऱ्या पावसाचा परिणाम कापूस व सोयाबीनवर झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी पावसाने ओलांडली. सोमवारपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे आता तरी शेतातील कामे होऊ शकतील, अशी अपेक्षा असताना हवामान खात्याने परतीचा पाऊस २० ऑक्टोबरपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याप्रमाणे पाच दिवसांच्या उघडिपीनंतर शनिवारी सायंकाळी चार वाजेपासून आभाळ भरून आले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अर्धा तास पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे पुन्हा शेतीपिकांवर परिणाम होणार आहे. तसेच नवरात्रातील कार्यक्रमदेखील विस्कळीत होऊ लागले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातही पुनरागमन
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात शनिवारी दुपारनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शहरात दुपारी १ च्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. असाच पाऊस औंढा नागनाथ, सेनगाव व कळमनुरी तालुक्यांतही झाला. हिंगोली आणि कळमनुरीच्या पैनगंगा सीमाभागात दुपारी ३ नंतर मेघगर्जनेसह पाऊस झाला. गेल्या चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात केली होती, तर अगोदरच्या पावसानेे शेत वाळले नसतानाच पुन्हा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

लातुरात हलका पाऊस
लातूर जिल्ह्यात चार दिवसांपासून उघडीप दिल्यानंतर शनिवारी सायंकाळी चार वाजेनंतर मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे शेतातील कामांना व्यत्यय आला असून तुळजापूर आणि रेणापूरला देवीदर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांना पावसाचा सामना करावा लागला. लातूरसह उदगीर, जळकोट, औसा, देवणी आदी तालुक्यांत हजेरी लावली.
बातम्या आणखी आहेत...