आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादला अतिवृष्टी धुवाधार पाऊस, सर्कलला सर्वाधिक १३७ मि.मी. पावसाची नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शहरासह परिसराला सोमवारी (दि.१०) मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक दुकानांसह नागरिकांच्या घरात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहरातील झाडे उन्मळली असून महावितरणचे खांब कोसळून विद्युत तारा तुटल्याने विजेचा खेळखंडोबा झाला होता. उस्मानाबाद सर्कलमध्ये एका दिवसात तब्बल १३७ मि.मी. पाऊस झाल्याने खरिपातील काढणीला आलेल्या तुरीसह रब्बीतील उगवून आलेल्या ज्वारी, हरभऱ्यासारखी पिके वाहून गेली आहेत.

या वर्षी पावसाने सरासरी न गाठल्याने खरिपाच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांवर घट झाली. शिवाय जमिनीत ओल नसल्याने रब्बीची पेरणी होऊ शकली नाही. जिल्ह्यात केवळ १९ टक्क्यांपर्यंतच रब्बीची पेरणी झाली होती. उमरगा, लोहा-यासह वाशी परिसरात पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या. सोमवारी जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी रब्बीच्या पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे, तर उस्मानाबाद महसुली मंडळात धुवाधार पाऊस झाल्याने पिके पाण्याखाली आली असून सखल भागातील पिके वाहून गेली आहेत, तर खरिपातील तुरीच्या पिकालाही पावसाचा फटका बसला आहे.
सोमवारी उस्मानाबाद तालुक्यात ५२ मि.मी., तुळजापूर आणि कळंब तालुक्यात प्रत्येकी १२ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने रब्बीच्या पिकांना दिलासा मिळाला असून खोळंबलेल्या पेरण्या पुन्हा सुरू होऊ शकतात, परंतु त्यांची वाढ अपेक्षेप्रमाणे होईल का, याची चिंता शेतक-यांना सतावत आहे. तर काही भागात जोरदार पाऊस झाल्याने कोवळ्या ज्वारीच्या पानांमध्ये माती गेल्याने ज्वारीचे पीक करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ शकते. शिवाय जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक महसुली मंडळे अजूनही तहानलेलीच असून त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
रुग्णालयाचा तळमजला पाण्यात
शहरातील छत्रपती शिवाजी चौक भागातील संजीवनी हॉस्पिटलच्या इमारतीच्या तळमजल्यात पाणी शिरल्याने रुग्णालयाशी निगडित असलेल्या विविध विभागांचे सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. पावसाचे पाणी तळमजल्यात शिरल्याने तळमजला तुडुंब भरला होता. त्यामुळे एक्सरे युनिट, सोनोग्राफी युनिट, ट्रेडमिल टेस्ट युनिट, कृत्रिम गर्भधारणा युनिट, पॅथॉलॉजी लेबोरेटरी, पंचकर्म युनिट, रेकॉर्ड रूम, ब्लड बँक, इलेट्रॉनिक युनिट पाण्याखाली आल्याने या सर्वच विभागांच्या महत्त्वपूर्ण मशीनसह कागदपत्रांचे नुकसान झाले आहे. पाण्यासह नाल्यांमधील गाळ या दुकानांत गेल्याने सर्व उपकरणे निकामी झाले आहेत. तसेच रक्ताच्या पिशव्यादेखील खराब झाल्या आहेत. पाण्याचा लोट तळमजल्यात गेल्याने या सुमारे १२ फूट पाणी साचले होते.
लातुरात अवकाळी बरसात
लातूर - जिल्ह्याच्या काही भागांत सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. लातूर परिसरासह निलंगा, औसा आदी भागांत हलक्या स्वरूपाची बरसात झाली. लातूर शहरात सुरुवातील रिमझिम बरसात झाली. रात्री १० वाजेच्या सुमारास एक जोरदार सडाका आला आणि उशिरापर्यंत तुरळक पाऊस पडत राहिला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. जिल्ह्याच्या काही भागांत रब्बीच्या पेरण्या झाल्या असून काही ठिकाणी ओल नसल्याने त्या रखडल्या आहेत. त्यामुळे उगवण झालेल्या पिकांना व पेरणीसाठी या पावसाचा ब-यापैकी फायदा होणार आहे. गहू, हरभरा, ज्वारी या पिकांना हा पाऊस वरदान ठरणार आहे; परंतु खरीप पिकांच्या सुरू असलेल्या राशींना अवकाळीचा फटका बसणार आहे. तुरीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.