उस्मानाबाद - जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये बुधवारी (दि.९) पावसाने जवळपास दोन तास चांगलेच झोडपून काढले. यामध्ये उस्मानाबाद शहरासह जिल्हाभरात दुपारनंतर हा पाऊस झाला.
उस्मानाबाद शहरामध्ये ५ सप्टेंबरच्या रात्रीपासून दररोज दमदार पावसाची हजेरी लागत आहे. दररोज किमान दोन ते तीन तास पडत असलेल्या पावसाने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. शहरातील अनेक कूपनलिकांची पातळी वाढली असून, भोगावती नदीलाही पाणी आले आहे. अशीच परिस्थिती शेतशिवारांमध्ये असून जलयुक्त शिवारअंतर्गत कामे झालेल्या गावांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
लातूर जिल्ह्यात १६ मि.मी.ची नोंद
लातूर जिल्ह्यात संपलेल्या २४ तासांत १६ िममी पाऊस झाल्याने आता यंदाची एकूण सरासरी २७५.९८ इतकी झाली आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ८०२ िममी पाऊस पडतो. त्यानुसार आजपर्यंत ५८९ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र ३४ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चार्याची समस्या गंभीर बनली आहे. परतीच्या पावसाने साथ दिल्यास काही दिवसांसाठी तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. तालुकानिहाय एकूण पाऊस असा : लातूर- २४८.२८, औसा- २४९.१९, रेणापूर-३४०.५ , उदगीर- २३०.४८, अहमदपूर-२५६.९८, चाकूर-२५६.८, जळकोट ३३४, निलंगा २६८.९६, देवणी- ३४९.६२, शिरूर अनंतपाळ-२२४.९९.मिमी.
हिंगोलीत १२.५३ मिमी पाऊस : मंगळवारी रात्री जिल्हाभरात १२.५३ मिमी एवढा सरासरी पाऊस झाला असून हिंगोली तालुक्यात सर्वाधिक २८.५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सेनगाव तालुक्यात १५ मिमी, वसमत येथे ११.५७ तर औंढा नागनाथ तालुक्यात ७.५० मिमी पावसाची नोंद झाली असून कळमनुरी तालुक्यात पावसाची नोंद निरंक आहे. आजपर्यंत जिल्ह्यात झालेल्या पावसाची टक्केवारी ५७ टक्क्यांवर गेली असून गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या या पावसामुळे पिकांना दिलासा मिळत आहे.
नांदेड शहरात मुसळधार
नांदेड शहरात बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या ४५ मिनिटांत ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. एका तासात ५२ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्ह्यात मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ९८.१८ मिमी (सरासरी ६.१४) पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सर्वाधिक ४१.१७ मिमी
पाऊस लोहा येथे झाला.
पाच मंडळांत अतिवृष्टी
औरंगाबाद - मंगळवारीही विभागातील ५ महसुली मंडळांत अतिवृष्टी झाली असून ९ मंडळांत ५० मिमीपेक्षा जास्त तर १६ तालुक्यांमध्ये २० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. आतापर्यंत सर्वात कमी पाऊस झालेल्या शिरूर कासार तालुक्यातही ३० मिमी पावसाची नोंद झाली.
अतिवृष्टीची ५ मंडळे
हिंगोली ७४ मिमी, तर नर्सी नामदेवमध्ये ७१, लोह्यात ८९, लातूर जिल्ह्यातील बाभळगावमध्ये ७५, तर पानचिंचोलीत ७५ मिमी पाऊस झाला.
५० मिमीवर पाऊस : चौका : ५०, फुलंब्री : ६०, पिंपळगाव रेणुकाई : ५०, विष्णुपुरी : ६०, कापसी : ५१, हयातनगर : ६१, बोरोळ : ५०, कोडगाव बु. : ५८, सोनपेठ : ५२.