आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसाने पिके आडवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोळेगाव - सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव परिसरातील खंडाळा, बोदवड, सारोळा, सराटी आदी ठिकाणी सोमवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील सोंगणीस आलेला गहू, हरभरा, ज्वारी आदी पिके जमीनदोस्त झाली. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके आडवी झाली, तर आंब्याचेही नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास गोळेगावसह अनेक खेड्यांना वादळी वार्‍यासह पावसाने झोडपून काढले. पावसाच्या तडाख्याने गहू, हरभरा, पालेभाज्या, वांगी, टोमॅटो पिकांची वाताहत झाली. अवकाळी पावसाने रब्बीची बहुतांश काढणीला आलेली पिके गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे. प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहेमागील वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने खरिपासह रब्बीची पिके बहरली होती. परंतु सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत.

नुकसान भरपाई द्यावी
मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. यंदाही हाताशी आलेली पिके अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली आहेत. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. -अनिल सुभाष मुळे, शेतकरी

निसर्गाने घास हिसकावला
सोयगाव तालुक्यात सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला आहे. तसेच मका, गहू, कांदा, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे तहसीलदार हरिश्चंद्र गवळी यांनी सांगितले आहे.