जालना - २०१२ च्या दुष्काळाची सर्वाधिक तीव्रता जालना जिल्ह्याने अनुभवली. या दुष्काळातून सावरण्यासाठी जिल्ह्यात अनेक कामे करण्यात आली. जालना शहरातील रामतीर्थ पुलाजवळ उभारण्यात आलेला शिरपूर पॅटर्नचा बंधारा हा त्यापैकीच एक. या बंधाऱ्यामुळे गेल्या वर्षीपासून येथे जवळपास १६ कोटी लिटर पाणी अडवले. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आठपट पाणी जमिनीत मुरले. त्यामुळे दुष्काळात कोरड्या पडलेल्या परिसरातील सुमारे तीन हजार बोअरला चांगले पाणी आले आहे.
दोन वर्षांपूर्वी संंपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळून निघाला होता. पाण्यासाठी जालनेकरांना भटकंती करावी लागत होती. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी आणि जालना शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी यासाठी शिरपूर पॅटर्नचे जनक डॉ. सुरेश खानापूरकर यांनी कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्न बंधारे बांधण्याची संकल्पना मांडली. या उपक्रमासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून देण्यापूर्वीच औरंगाबाद येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या जालना शाखेने तसेच घाणेवाडी जलसंरक्षण मंचाने पुढाकार घेतला. यातून निधोना गावाजवळ आणि शहरात रामतीर्थ पुलाजवळ असे दोन बंधारे उभारण्याचे काम सुरू झाले. अवघ्या महिनाभरात हे काम पूर्ण झाले. त्यामुळे गतवर्षीच्या पावसाळ्यातच हा बंधारा ओसंडून वाहिला. त्यानंतर वर्षभर यात पाणी साठले. या वर्षी उशिरा पाऊस झाला तरीही गेल्या १० दिवसांपासून झालेल्या चांगल्या पावसामुळे बंधारा ओसंडून वाहतो आहे. त्यामुळे रामतीर्थ बंधाऱ्याच्या अडीच किलोमीटर परिसरातील बोअरना मुबलक पाणी आले आहे.
तीन किमी परिसराला लाभ
३ किमी परिसरातील बोअरला लाभ झाला आहे. दुष्काळात कोरडे पडलेले बोअर, हातपंपांना आता मुबलक पाणी आहे. जालना शहरातील संकलेचानगर, संभाजीनगर, भोकरदन नाका, रामतीर्थ परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे.
पाणीपातळी शंभर फुटांवर
बंधाऱ्यासाठी ५० मीटर लांबीची भिंत बांधली. भिंतीची उंची ६ मीटर आहे. यात ५०० मीटर लांब नदीपात्र २० फुटांपर्यंत खोल केले. त्यामुळे या बंधाऱ्यात १६ कोटी लिटरहून अधिक पाणी साठवता येते. यामुळे परिसरातील पाणीपातळी जवळपास शंभर फुटांवर आली आहे.
वर्षभरात ९६ कोटी लिटर पाणी मुरले
जलतज्ज्ञ डॉ. सुरेश खानापूरकर यांच्या माहितीनुसार शिरपूर बंधाऱ्यामुळे जितके पाणी अडवले जाते त्याच्या आठपट पाणी दरवर्षी जमिनीत मुरते. त्यामुळे रामतीर्थ बंधाऱ्यातून गेल्या वर्षभरात ९६ कोटी लिटर पाणी जमिनीत मुरले. त्यात या वर्षी आणखी भर पडणार आहे. परिणामी, भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
आणखी आठ बंधारे मंजूर
कुंडलिका नदीवर १० बंधारे बांधण्यात यावेत, असे डॉ. खानापूरकर यांनी सुचवले होते. त्यानुसार (रामतीर्थ आणि निधोना) असे दोन बंधारे लोकसहभागातून पूर्ण झाले आहेत, तर आणखी आठ बंधारे बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
शासनाने ताबा घ्यावा
लोकसहभागातील कामाचे उत्तम उदाहरण म्हणजे रामतीर्थ आणि निधोना येथील बंधारे आहेत. हे काम पूर्ण होऊन यात पाणी अडवले जात असले, तरी शासनाने हे बंधारे अद्याप ताब्यात घेतले नाहीत. त्यामुळे शासनाने ते ताब्यात घ्यावे व त्यांची देखभाल करावी, अशी मागणी घाणेवाडी जलसंरक्षण मंचाने केली आहे.