आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain News In Marathi, Pola Festivel, Divya Marathi

पोळ्याआधीच थकला पावसाळा, खरीप हंगाम धोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - अवघ्या सात दिवसांवर पोळा सण येऊन ठेपला आहे. ‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ अशी म्हण प्रचलित आहे. यंदा तर सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारलेली आहे. बहुतांश सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत. श्रावण महिन्यातही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. श्रावण महिना अंतिम टप्प्यात असून पावसाची अवकृपा मात्र अद्यापही कायम आहे.

पाऊस नसल्याने उगवलेली पिके पावसाअभावी करपून जात असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यात 73 टँकर व 453 अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास पाणी टंचाई तीव्र होऊन खरीप हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अगोदरच दुष्काळी जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. मागील काही वर्षांपासून पाऊस पाठ फिरवत असल्याने शेतक-यांवर संकट कोसळले आहे.
यावर्षी पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. अत्तापर्यंत सरासरी 22 टक्केच पाऊस झाला आहे. चार महिन्यांचा पावसाळी हंगाम गृहित धरल्यानंतर अडीच महिन्यांत किमान 50 ते 60 टक्के पाऊस होणे अपेक्षीत आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने शहरांसह ग्रामीण भागात भयानक स्थिती निर्माण झाली आहे. याचा दैनंदिन आर्थिक व्यवहारावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे. बहुतांश शेतक-यांनी उसनवारी करून खरीपाची पेरणी केली आहे. आता पावसाने दडी मारल्याने शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. खरीपातील पिकांच्या वाढीसाठी पावसाची नितांत गरज असून, शेतकरी चातकाप्रमाणे
पावसाची वाट बघत आहेत.

5.5 कोटींचा आपत्कालीन आराखडा
यावर्षी पाऊस गायब झाल्याने प्रशासनावरही ताण आला आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येतो. यावर्षी ऐन पावसाळ्यामध्ये टंचाई असल्याने प्रशासनाने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2014 या काळासाठी 5 कोटी 45 लाख 94 हजार रुपयांचा आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला.

अस्मानी संकटांचा फेरा
शेतक-यांच्या मागील अस्मानी संकटांचा फेरा पाठ सोडायला तयार नाही. कधी दुष्काळ तर कधी बेमोसमी पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे. दोन वर्षांच्या दुष्काळानंतर मागील वर्षी रब्बी हंगामातील पिके बहरात आली असतानाच जिल्ह्यात सर्वत्र गारपीट झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. यातून सावरत शेतक-यांनी यंदाच्या खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.