आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लई दिवसानं, लई नवसानं पुनरागमन, लातुरात तासभर जोरदार पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - गेल्या दहा-बारा दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने बुधवारी लातूर िजल्ह्यात कमीअधिक प्रमाणात हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परिणामी खोळंबलेल्या पेरण्यांना सुरुवात होणार आहे. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात हलका पाऊस झाला. कळंब, वाशी परिसरातही पावसाने हजेरी लावली.

यंदा मृगाच्या पूर्वाधात चांगली सुरुवात झाल्याने सरासरी ८५ मिमी पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्ह्याच्या काही भागांत चाड्यावर मूठ धरली. त्यातून खरिपातील अंदाजे ३० टक्के पेरण्या अल्प ओलीवर उरकण्यात आल्या. उदगीर, जळकोट, रेणापूर, देवणी या तालुक्यांनी पेरणी करण्यात आघाडी घेतली. परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. ज्यांनी पेरा केला त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले होते.

बुधवारी जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक, कुठे मध्यम तर काही भागात चांगला पाऊस झाला. लातूर शहर परिसरात साडेतीन वाजेच्या सुमारास तासभर चांगला पाऊस पडला. उदगीरमध्ये दुपारी मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी झाली. रेणापूर, देवणी, निलंग्यात पंधरा-वीस मिनिटे पाऊस पडला. चाकूर आणि औसा भागातही पावसाने हजेरी लावली.

हिंगोलीत पावसाचे पुनरागमन
दहा दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने सायंकाळी ६ वाजता पुनरागमन केले असून हिंगोली, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यांमध्ये पाऊस झाला. हा पाऊस सर्वदूर नसला, तरी ज्या भागात झाला, त्या ठिकाणी चांगला झाला आहे. कनेरगाव नाका, हिंगोली, कळमनुरी, वारंगा, औंढा नागनाथ आदी भागांत हा पाऊस झाला.
बाभळीचे १४ दरवाजे उघडले, पाणी तेलंगणात
नांदेड - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, बुधवारी बाभळी बंधाऱ्याचे सर्व १४ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे बंधाऱ्यात जमा झालेले ४.८२ दलघमी पाणी तेलंगणात वाहून गेले. जलसंपदा विभागाच्या त्रिस्तरीय समिती सदस्यासमोर दरवाजे उघडण्याची कारवाई पार पडली.

बाभळी बंधाऱ्याच्या कामाला तत्कालीन आंध्र सरकारने विरोध केला. तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी तर हा राजकीय मुद्दा बनवून १५ ते २० जुलै २०१० दरम्यान राज्य सरकारला वेठीला धरले. सर्वोच्च न्यायालयात हे भांडण गेल्यानंतर न्यायालयाने सशर्त बाभळी बंधाऱ्याला परवानगी दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार, १ जुलै ते २८ ऑक्टोबर या कालावधीत बंधाऱ्याचे गेट खाली टाकता येणार नाही. या कालावधीत गोदावरीचे पाणी रोखता येणार नाही. केंद्रीय जलआयोग, आंध्र व महाराष्ट्राचे जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांसमोर दरवर्षी गेट उघडण्याची व बंद करण्याची कारवाई केली जावी, असेही न्यायालयाने म्हटले. त्यानुसार कार्यकारी अभियंता एस. एस. अवस्थी, तेलंगणातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता बी. रामाराव, केंद्रीय जलआयोगाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास बैरी यांच्या उपस्थितीत बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आले. सकाळी ११ वाजता गेट उघडण्याला प्रारंभ झाला. सायंकाळपर्यंत सर्व दरवाजे उघडण्यात आले.

पुनर्विचार याचिका दाखल करा
यावर्षी मृग नक्षत्रात झालेल्या पहिल्याच पावसात बंधाऱ्यात पाणी जमा झाले. गेट उघडल्याने राज्याच्या हक्काचे ४.८२ दलघमी पाणी तेलंगणात गेले. बाभळी बंधारा होऊनही या भागाला त्याचा फारसा लाभ झालेला नाही हे गेट उघडण्यावरून स्पष्ट झाले. गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी बाभळीत पाणी दिसू लागले. आता ऑक्टोबरपर्यंत दरवाजे उघडेच राहणार असल्याने पावसाळ्यात पडणारे पाणी तेलंगणात जाणार. जेव्हा गेट बंद करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र पावसाळा संपलेला असेल. त्यामुळे बाभळीत पाण्याचा थेंबही असेल की नाही सांगता येत नाही. यावर राज्य सरकारने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, असे बाभळी बंधारा कृती समितीचे सचिव प्रा. बालाजी कोंपलवार यांनी दै. ‘दिव्य मराठी’ला सांगितले.