आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादचे पाणी यंदाही वाहून जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - दुष्काळाने होरपळणाऱ्या उस्मानाबाद शहराला जलपुनर्भरण काळाची गरज असल्याचे अद्याप उमगलेले दिसत नाही. कारण मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊनही शहरात जलपुनर्भरणाची चळवळ उभी राहू शकली नाही. त्यामुळे यंदा पावसाचे पाणी वाहून जाणार आहे.

जिल्हा दुष्काळाच्या गर्तेत ओढला गेला आहे. कधी नव्हे इतक्या भयाण दुष्काळाची तीव्रता यावर्षी जिल्ह्याने अनुभवली. मात्र आपत्ती ही संधी मानून परिस्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न होईल, अशी शक्यता होती. त्यासाठी सोशल मीडियावर चर्चेचे पाट वाहत होते. अनेक संस्था-संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद शहरात जलपुनर्भरणाची चळवळ उभी करण्याचा सूर काढला होता.

पुनर्भरण काळाची गरज असून त्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी अनेकांनी बोलून दाखविली होती. संपूर्ण उन्हाळ्यात या विषयावर चर्चा झडत असताना पावसाळा सुरू झाला तरी पुनर्भरणाची कामे झालेली दिसत नाहीत. उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती शिवजयंती समिती, शिवराज्याभिषेक सोहळा समिती, शिक्षक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, महिला संघटना, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पुनर्भरणासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन शहराला दिले होते. वास्तविक, सगळ्याच संघटनांना या कामाचा विसर पडलेला दिसत आहे. गरज असूनही या कामाकडे संघटनेने दुर्लक्ष केलेले असताना पालिकाही यासाठी उदासीन दिसत आहे. पालिकेने मालकीच्या इमारतींवर पुनर्भरण करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे काहीही झालेले नाही.

पालिकेचे प्रयत्न अपुरे
शासन निर्णयानुसार पालिका क्षेत्रात घराचे पुनर्भरण करणाऱ्या कुटुंबांना मालमत्ता करामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. मात्र, या विषयाची जनजागृती करण्यात पालिका कमी पडत आहे. पालिकेने यासाठी प्रचार-प्रसार करणे गरजेचे आहे.

५० कुटंुबीयांनी केले पुनर्भरण
गेल्या महिन्यात पुनर्भरणाच्या कामाविषयी दै.‘दिव्य मराठी’ने अभियान चालविल्यानंतर शहरातील शिक्षक संघटना, डॉक्टर आणि काही सामान्य नागरिकांनी घराच्या छतावरील पाणी जमिनीत मुरविण्यासाठी पुनर्भरण केले. मात्र, १८ हजारांपैकी केवळ ५० कुटंुबांनी पुनर्भरण केले आहे.
बातम्या आणखी आहेत...