आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची हाजेरी, पिकांना मिळाले जीवदान.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - तालुक्यात मागील एक महिन्यापासून पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले असताना बुधवारी दुपारी एक वाजता जोरदार पाऊस झाला. गेवराई तालुक्यात खरिपाचे १ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र असून महिनाभरापूर्वी ५५ टक्के पेरण्या झाल्या. पेरण्यांनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी सध्या दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे तालुक्यात कपाशीची अधिक लागवड झाली आहे. बुधवारी दुपारी एक वाजता गेवराईत अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. त्याचबरोबर तालुक्यातील उमापूर, सिरसदेवी, रानमळा येथे पंधरा मिनिटे पाऊस झाला.

हिंगोलीत समाधानकारक
मंगळवार आणि बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हाभरात समाधानकारक पाऊस झाला असून सरासरी १७.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त ३९.६७ मिमी पावसाची नोंद झाली असून हिंगोलीतही चांगला पाऊस झाला आहे. पिके वाळून जाण्याच्या दरम्यान झालेल्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. हिंगोली तालुक्यात १८.८६ मिमी पावसाची नोंद झाली असून औंढा नागनाथ १८.७५, कळमनुरी ८.८३, तर वसमत तालुक्यात न झाल्यासारखा म्हणजेच ०. ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी दिवसभरात सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्यांत तुरळक पाऊस झाला.
नांदेडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस
प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळनंतर पावसाने मध्यम स्वरूपाची हजेरी लावली. या पावसामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण १४२.०७ (सरासरी ८.८८) मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस किनवट येथे २२.७१ मिमी झाला. त्यानंतर हिमायतनगर येथे २२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वात कमी १ मिमी पाऊस नायगाव तालुक्यात झाला. या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची सरासरी १८१.२६ मिमी झाली. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस अद्यापही झाला नाही. परंतु मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. यापूर्वीही पावसाची रिमझिम काही प्रमाणात सुरू होती. काही भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्या भागात पिकांचा प्रश्न आहे. परंतु बहुतांश भागातील पिकांना पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही, असे जिल्हा कृषी अधीक्षक टी.एस. मोटे यांनी सांगितले.