आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्‍काळात महाराष्‍ट्रामध्‍ये आयपीएल कशाला? राज ठाकरेंचा शरद पवारांना प्रश्‍न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- राज्यातील 336 सिंचन प्रकल्प 20-25 टक्के निधीअभावी रखडले आहेत. निधी का दिला जात नाही? प्रकल्प पूर्ण झाले तर कंत्राटदारांकडून मिळणारे पैसे बंद होतील. त्यामुळे दिला जात नाही, असा आरोप करतानाच सिंचन विभागातील अधिकारी, कंत्राटदारांसह खात्याच्या मंत्र्यांची संपत्ती जाहीर करा, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी केली.
जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या सभेत राज यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, राष्‍ट्रवादी काँग्रेसची दादागिरी यांचा समाचार घेतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यावर टीका केली. राज म्हणाले, रस्ते, सिंचन, ऊर्जा, गृह ही खाती गेल्या 14 वर्षांपासून राष्‍ट्रवादीकडे आहेत. त्यांनी या काळात कोणत्याच सुविधा दिल्या नाहीत, उलट राज्याची वाट लावली. म्हणूनच मी राष्‍ट्रवादीवर टीका करतोय. घोटाळ्यातील पैसा राष्‍ट्रवादीकडून दादागिरीसाठी वापरला जात असल्याचा आरोप राज यांनी केला. आपण सोलापूरच्या सभेत जे वक्तव्य केले ते ऐकून ‘गडी बिथरला’ अशी टीका अजित पवारांनी केली होती. तुम्हाला हीच भाषा कळते त्यामुळे त्याच भाषेत बोलणार आहे. ऐकायचे नसेल तर कानात बोळे घाला. जशास तसे उत्तर देण्याची भाषा पवार करत आहेत, मात्र गृहखाते आणि पोलिस बाजूला करून समोर येऊन दाखवा, स्वत:च्या दोन पायावर परत जाल का, असा खुला इशारा त्यांनी दिला. तुमच्याकडे प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत. त्यांचे काहीच नुकसान होत नाही. यांना सत्तेचा व पैशाचा माज आला आहे. हा माज उतरला पाहिजे. उगाच काळे झेंडे दाखवू नका. अन्यथा त्याचे लाल बावटे होतील. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारचा कार्यकाळ आता फक्त दीड वर्ष राहिला आहे. त्यानंतर आमची सत्ता येईल, त्यावेळी अजित पवार काय कराल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

राज यांची ‘ठाकरी’
1) राष्‍ट्रवादीला सत्ता आणि पैशाचा माज आलाय तो उतवरलाच पाहिजे.
2) काळे झेंडे दाखवाल, तर याद राखा लाल बावटे होतील.
3) सात तारखेला पुण्यात येतोय, हिंमत असेल तर रोखा. कोणी कुठे जायचं आणि नाही जायचं ते हे कोण ठरवणार?
4) डिसेंबरनंतर प्रत्येक तालुक्यात सभा घेणार
5) मनसेची बदनामी करण्याचे कारस्थान अजित पवारांच्या घरी शिजले.
6) महाराष्‍ट्रात दुष्काळ नेते मात्र सेव्हन स्टार, फाईव्ह स्टार.

मी बोललो तरी पोरकटपणा किंवा बालिश प्रश्न ठरवणार्‍या शरद पवारांनी माझ्या तीन प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मी वाट पाहतोय, असे राज म्हणाले.
त्यांचे प्रश्न पुढीलप्रमाणे -
1. हा दुष्काळ 1972 पेक्षा भयानक आहे असे पवार म्हणतात. मग तो कुणामुळे निर्माण झाला? निसर्गामुळे की सरकारमुळे ?
2.सिंचनाचे 70 हजार कोटी कुठे गेले?
3.सरकार सिंचन प्रकल्प पूर्ण केले म्हणते, परंतु कालवे आणि पाणी वितरिका कोण आणि कधी पूर्ण करणार ? परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना, जायकवाडी टप्पा दोन व बीडच्या मांजरा प्रकल्पांच्या किमती हजारो कोटींपर्यंत कशा फुगल्या? हे प्रकल्प का रखडले?

दुष्काळामुळे आयपीएल रद्द करा
पाणी, चार्‍याचे दुर्भिक्ष दुष्काळामुळे ओढवले आहे, अशा वेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यात एप्रिलमध्ये होणारे आयपीएलचे क्रिकेट सामने रद्द करावेत. दुष्काळ असताना आयपीएलची गरज काय, असा सवाल राज यांनी केला.

7 रोजी पुण्यात येतोय, हिंमत असेल तर अडवा : राज
पुण्यात येऊनच दाखवा, या राष्‍ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या आव्हानावर ‘7 तारखेला येतोय,हिंमत असेल तर अडवा,’ असे प्रतिआव्हान राज यांनी दिले.

लपून-छपून नको, उघड येऊन दाखवाच : काकडे
‘अजितदादा, शरद पवारांचा अपमान सहन करणार नाही. लपून-छपून नको, राज यांनी पुण्यात उघड येऊन दाखवावे,’ असे काकडे यांनी पुन्हा म्हटले.

पोलिस बाजूला ठेवून मैदानात उतरा
प्रत्येक तालुक्यात सभा घेणार आहे. दगडफेक करणार्‍यांनी पोलिस बाजूला ठेवून मैदानात उतरावे, असे राज म्हणाले.

महाराष्‍ट्राला यांनी लुटले
सिंचन कंत्राटे देण्यात आलेल्या नेत्यांची यादीच राज यांनी दिली. त्यात औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण यांचाही उल्लेख आहे.