जालना - मराठवाड्यात मनसेला खूपच चांगला प्रतिसाद असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अनेक कार्यकर्ते राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून निवडणूक लढवावी, अशी मागणी करीत आहे. माझीही तीच भावना आहे, त्यामुळे मुंबईत गेल्यानंतर आपण राज यांना तसा सल्ला देणार आहोत, अशी माहिती मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
नांदगावकर यांनी दोन दिवस जिल्ह्याचा आढावा घेतला. राज यांनी निलंगा, भोकरदन, माजलगाव या मतदारसंघांतून लढावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे या दोन नेत्यांना मराठवाडा मुकला आहे. राज ठाकरे यांनी या भागातून निवडणूक लढवल्यास संपूर्ण मराठवाड्याला त्याचा निश्चितच फायदा होईल, असे मत आमदार नांदगावकर यांनी व्यक्त केले.
पक्षाची ब्ल्यू प्रिंट हाच निवडणूक प्रचाराचा मुद्दा असेल व पुढील 8 ते 10 दिवसांत ही ब्ल्यू प्रिंट तयार होईल. या ब्ल्यू प्रिंटमध्ये कृषि, आरोग्य, शिक्षण, रस्ते, उद्योग, पर्यावरण, पर्यटन विकासासंदर्भात धोरणांचा समावेश असेल, असेही ते म्हणाले.