आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray On Marathwada Tour, Sleet News In Marathi

50 गाड्यांचा ताफा, राज ठाकरेंचा न्याराच तोरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसायला आलेल्या शरद पवारांनी आचारसंहितेमुळे शासकीय विश्रामगृहाऐवजी कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करणे पसंत केले. दुसरीकडे राज ठाकरे मात्र लातूर मुक्कामी आल्यानंतर थ्री स्टार हॉटेलमध्ये थांबले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या या छोटेखानी दौर्‍याच्या ताफ्यात 50 गाड्या होत्या.

चार दिवसांपूर्वी शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यात जेव्हा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पोहोचले, तेव्हा त्यांच्या ताफ्यात सरकारी-खासगी धरून फार तर 25-30 गाड्या होत्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यातही एवढ्याच गाड्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांची मोठी संख्या आश्चर्यकारक होती, हा शेतकर्‍यांमध्ये चर्चेचा विषय होता.

घोषणा नकोच आग्रह
राज ठाकरे पहिल्यांदा मसलगा गावात पोहोचले अन् गाडीतून उतरले. त्या वेळी तिथल्या एका उत्साही कार्यकर्त्याने ‘जय..’ची घोषणा दिली. त्याच्याकडे राज यांनी रोखून पाहिल्यानंतर स्थानिक नेत्यांनी घोषणा नको- घोषणा नको असे बजावले. लागलीच पुढच्या निटूर गावात हा संदेश पोहोचला. तिथे उभारलेल्या छोट्याशा व्यासपीठावरून स्थानिक कार्यकर्त्यांनी मग राज ठाकरे आल्यानंतर एकाही कार्यकर्त्याने घोषणा देऊ नका, असा धोशा लावला.

तासाभराचा दौरा
मुळात राज यांचा दौरा सकाळी आठ ते सव्वाआठ वाजता सुरू होणार असल्याचे सांगितल्याने पत्रकार व शेतकरी दिलेल्या वेळेत हजर होते. तथापि, नुकसानग्रस्त रानात राज साडेदहा वाजता पोहोचले. त्यांचा दौरा तीन तास चालला. मसलगा येथे 7 मिनिटे, ताजपूर 10, निटूर 5, निटूर चौक 4, लामजना 20 व औसा 15 मिनिटे असा सुमारे एक तास त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. उर्वरित वेळ प्रवासात गेला.

शासनावर टीका
आपत्ती आल्यानंतर 13 दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरा काढला, याबाबत विचारले असता राज्य सरकार सर्वच बाबतीत उदासीन असून तोंडाला पाने पुसणे हाच सरकारचा कार्यक्रम असल्याची टीका राज यांनी केली. आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकसभेची निवडणूक पुढे ढकलावी का, या प्रश्नावर त्यांनी ही देशपातळीवरील निवडणूक असून एका राज्यापुरता निर्णय घेणे कसे जमेल, असा प्रतिप्रश्न केला.

शेतकर्‍यांनो, आत्महत्या करू नका
आभाळ फाटावं अशी परिस्थिती तुमच्यावर ओढवली आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. धीर धरा, आत्महत्या करू नका. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी स्वत: सरकारपर्यंत जाईन, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी लातूर जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना धीर दिला. गारपीटग्रस्त भागाच्या दौर्‍यानिमित्त राज लातुरात आले होते. मसलगा, निटूर, लामजना येथे त्यांनी पाहणी केली.