आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे, सभेतील मनसे आमदार - पदाधिकार्‍यांचा सूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - राज्यात सध्या पडलेला दुष्काळ हा 1972 पेक्षा भीषण आहे. हा दुष्काळ निर्सगामुळे नसून तर राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे पडला असल्याचा सूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत शनिवारी मनसेचे आमदार व पदाधिकार्‍यांनी काढला. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

या वेळी जिल्ह्याचे संपर्क अध्यक्ष अँड. गणेश सातपुते म्हणाले, राज ठाकरे यांनी राज्याचा दौरा कोल्हापूर येथून सुरू केला. राज्यव्यापी दौर्‍यातील जालना येथील ही चौथी सभा आहे. राज ठाकरे यांच्या दौर्‍यामुळे राज्यातील इतर राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. सभेच्या निमित्ताने गेल्या 15 दिवसांपासून जिल्हा पिंजून काढला असता दुष्काळाची भयानक स्थिती दिसून आली. दुष्काळ निवारणासाठी शेकडो कोटींची मागणी करण्यात येत आहे. मात्र, दुष्काळाच्या झळा कायम असून पाण्यावाचून नागरिक व जनावरांना भटकंती करावी लागत आहे. चारा छावण्यांसाठी दोन लाख रुपयांचे डिपॉझिट ठेवले आहे. हे डिपॉझिट सर्वसामान्य माणूस आणणार कुठून, हा प्रश्न आहे. ज्या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या त्या सर्व राजकारण्यांच्या आहेत. दुष्काळाच्या काळातही घरे भरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप सातपुते यांनी केला. या वेळी मनसेचे विभागीय संघटक सुभाष पाटील म्हणाले, 28 वर्षांपासून जी जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती आहे ती सध्या तशीच आहे. एक महिन्याला शहराला पाणी मिळते, ही अवघड बाब आहे. पालकमंत्री टोपेंना जिल्ह्याचा विकास करायचा नसून ही परिस्थिती राजकारण्यांमुळे आली असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठवाड्यातील सहकारी कारखाने विकून त्यांचे खासगीकरण होत आहे. शरद पवार हे देशाचे मंत्री आहेत की पश्चिम महाराष्ट्राचे, असा प्रश्न पडत असल्याचे ते म्हणाले. राजकारणाला कलाटणी देण्यासाठी राज ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी या वेळी जाहीर सभेस उपस्थितांना केले. दुष्काळाची, पाणीटंचाईची झळ जास्तकरून महिलांना बसत असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना कोसोदूर जावे लागत आहे. शहरात अनेक दिवस पाणी येत नाही हे किती दिवस सोसायचे? महिलांनी एकजूट दाखवून राजकर्त्यांच्या घरावर मोर्चा काढावा. आतापर्यंत लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देत आले आहेत. महिलांना 50 टक्के आरक्षणापेक्षा सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे. ती सरकारने द्यावी, असे मनसे महिला आघाडीच्या रिटा गुप्ता म्हणाल्या. या वेळी आमदार राम कदम म्हणाले की, आमच्यासोबत जे प्रेमाने वागतील त्यांच्याशी प्रेमाने वागू, कोणी खेटत असेल तर त्यांना तसेच उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला. पोलिसी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेचा एक आमदार होण्यासाठी 19 वर्षे लागली. मनसेचे अवघ्या साडेतीन वर्षांत 13 आमदार निवडून आले. राज ठाकरे यांचे विचार महाराष्ट्राला दिशा देणारे आहेत. सध्या राजकर्ते घरे भरण्याची कामे करीत आहेत. लोकांच्या हितासाठी, प्रश्नांसाठी पक्ष लढा देत असल्याचे कदम म्हणाले. गेल्या 50 वर्षांतला सर्वात भीषण दुष्काळ सध्या राज्यात पडला आहे. 1972 च्या दुष्काळात अन्नधान्याची टंचाई होती. पण सध्याच्या दुष्काळात जीवनासाठी महत्त्वाच्या असलेल्या पाण्याची भीषण टंचाई आहे. कोट्यवधी रुपये पाण्याच्या विविध योजनांवर खर्च करण्यात आले आहेत; परंतु महाराष्ट्र कोरडा असल्याचे मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी सांगितले.