आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंकररावांची मानसकन्या रजनीताई पुन्हा राजकारणात सक्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांची मानसकन्या असलेल्या रजनी पाटील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बोटाला धरून राजकारणात आल्या आणि भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवत पहिल्यांदाच संसदेत पोहोचल्यादेखील! मात्र अत्यल्प काळातच भाजपची साथ सोडून सोनिया गांधींच्या निकटवर्तीय झाल्या, नानाविध पदे भूषवली, परंतु काँग्रेसचे सरकार असूनही परळी-बीड-नगर लोहमार्गासाठी चकार शब्द न बोलणार्‍या रजनी पाटील केंद्रातून काँग्रेस पायउतार होताच आणि मुंडेंच्या अकाली निधनानंतर या लोहमार्गाला निधी मिळण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत.

काँग्रेस आणि शरद पवारांना मानणार्‍या बीड जिल्ह्यात मागील चाळीस वर्षांपूर्वी शिवाजीराव पंडित, सुंदरराव सोळंके, बाबूराव आडसकर, केशरकाकू क्षीरसागर, पंडितराव दौंड यांनी कुशल राजकारणातून सत्तास्थाने काबीज केलेली होती. परंतु त्याच काळात जनसंघाचे प्रमोद महाजन- गोपीनाथ मुंडे ही जोडगोळी आणि काँग्रेसमध्ये अशोक पाटील या युवा नेत्यांचा उदय झाला. महाजन भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात गेले तर मुंडे राज्यात स्थिरावले. काँग्रेसमधील दुफळीचा फायदा उठवत मुंडेंनी भाजपचे आणि स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याला सुरवात केली. दुसरीकडे शंकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांची मानसकन्या रजनी पाटील गृहिणी म्हणूनच होत्या. परंतु त्यांचे पती अशोक पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्रीपद आले आणि यातून त्यांचे जिल्ह्यात राजकारण सुरू झाले. सन 1995 मध्ये राज्यात युती सरकार आल्यानंतर पुढील वर्षीच 1996 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंडेंनी उमेदवाराचा शोध सुरू केला.

काँग्रेसच्या अंतर्गत कलहात अशोक पाटील यांचा वेगळाच गट होता. गटातटाचा फायदा उठवत मुंडेंनी रजनी अशोक पाटील यांना भाजपात आणून लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्या निवडूनही आल्या. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्या खासदार होत्या. सन 1998 ला लोकसभा निवडणुका लागल्या. भाजपकडून रजनी पाटील याच उमेदवार असतील, असे चित्र होते. परंतु काँग्रेसमध्ये केंद्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर उलथापालथी सुरू झाल्या. सीताराम केसरी यांच्या अध्यक्षपदाच्या राजकारणात सोनिया गांधी राजकारणात सक्रीय झाल्या. हे हेरून शंकररावांची मानसकन्या रजनीताईंनी थेट सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा झाल्यानंतर त्यांच्याशी नाळ जोडली. यात यशस्वी होताच भाजपची साथ सोडून त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला. संभाषण कौशल्य, इंग्रजीवरील प्रभुत्व, समयसूचकता या बाबींमुळे रजनी पाटील यांनी सोनिया गांधींना आपलंसं करून घेतलं. त्या बळावर त्यांना सोनिया गांधींनी महिला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, केंद्रीय समाजकल्याण बोर्डाचं अध्यक्षपद बहाल केलं आणि मागील वर्षभरापूर्वी राज्यसभेवर वर्णी लावली. मात्र, मागील सोळा वर्षांच्या कालावधीत केंद्रात काँग्रेस आघाडीचं सरकार असूनही परळी- बीड- नगर लोहमार्गाला निधी मिळण्यासाठी एकदाही चुकूनही शब्द काढला नाही. रजनी पाटील यांनी रेल्वे प्रश्नी मुंडेंना एकदाही साथ दिली नाही.

परळी- बीड - नगर रेल्वेसाठी भरीव निधीची मागणी
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. दुर्दैवाने बीड जिल्ह्याचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. रेल्वे अर्थसंकल्प मुंडेंविना जाहीर झाला आणि जिल्ह्याच्या पदरी वाटाण्याच्या अक्षता आल्या. मुंडेंची कन्या पंकजा पालवे भाजपमध्ये सक्रिय झाल्या. पक्षाने त्यांना कोअर कमिटीत स्थान दिले. प्रदेशाचे नेतृत्व जिल्ह्याला लाभल्याचे पाहून मात्र खासदार रजनी पाटील आक्रमक झाल्या आहेत. रजनी पाटील यांनी पुरवणी अर्थसंकल्पात परळी- बीड - नगर लोहमार्गासाठी भरीव निधी देण्याची मागणी लावून धरली. काँग्रेसमध्येही महिलांना स्थान मिळत नसल्याचा आरोप करत औरंगाबादेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावरही तोफ डागली.