आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Ghadge Firing Case : Mumbai's Police Take Money For Murder

राजेंद्र घाडगे गोळीबार प्रकरण: मुंबईच्या पोलिसाला खुनाची सुपारी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - गेवराई तालुक्यातील शिक्षकांच्या बदल्या व अन्य राजकारणात बळी गेलेले पंचायत समिती सभापतींचे स्वीय सहायक तथा शिक्षक राजेंद्र घाडगे यांच्या चार मारेक-यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यात मुंबईच्या पोलिसाने सुपारी घेत घाडगेंवर गोळीबार केल्याचे समोर आले असून बीड, पैठण, औरंगाबाद व मुंबईच्या चौघांनी या शिक्षकाचा काटा काढल्याचे स्पष्ट होत आहे.
गेवराई तालुक्यात मागील आठवड्यात गाजलेल्या शिक्षक घाडगे खूनप्रकरणाचा तपास पोलिसांसाठी आव्हान आणि डोकेदुखीचा विषय ठरला होता. गोळीबार, खून प्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा यासाठी पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी दरोडा प्रतिबंधक पथक, स्थानिक गुन्हे शाखा, गेवराई पोलिस अशी पथके स्थापन करून आरोपींच्या शोधासाठी पाठवली होती. शिक्षकाच्या खुनाची घटना 28 डिसेंबर घडली. पोलिस पथकांनी 3 जानेवारीपर्यंत म्हणजेच अवघ्या पाच दिवसांत कट रचणा-या चौघांना जेरबंद केले. यात गोळीबार करणारा, मुख्य आरोपी, पिस्तूलातून गोळी झाडणारा मुंबईचा पोलिस कर्मचारी व अन्य एकाचा यात समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
असा झाला तपास
गेवराई तालुक्यातील पंचायत समितीचे उपसभापती यांचे स्वीय सहायक आणि शिक्षक म्हणून राजेंद्र बाबासाहेब घाडगे काम करत होते. गेवराई शहरातील माउलीनगर येथील शिक्षक शिवाजी चौरे यांचा आणि राजेंद्र घाडगे (मृत) यांचा आपसात वाद झाला होता. याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी चौरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौरे यांची गेवराई तालुक्यातील दैठण येथून मौजे सिंदफणा चिंचोली येथे घाडगे यांच्या सांगण्यावरून बदली झाली.
त्यामुळे चौरे यांची गैरसोय सुरू झाली. तसेच घाडगे त्यांच्या पदाचा गैरवापर करून शिक्षकांच्या को-या चेकवर स्वाक्ष-या घेणे, शाळेच्या सरकारी योजनेचे पैसे परस्पर उचलणे, शालेय व्यवस्थापन समिती स्थपन करण्यात हस्तक्षेप करणे यासह अन्य कारणामुळे चौरे आणि घाडगे यांच्यामध्ये बदली प्रकरणावरून वाद झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत चौरे यांनी सांगितले.
चौरे यांनी मुंबई येथील पोलिस कर्मचारी परमेश्वर बडे, जालना येथून नामदेव घुगे आणि औरंगाबाद येथून सुनील वाघ यांना गेवराईत 28 डिसेंबर 2013 रोजी बोलावून घेतले. मुंबई येथील पोलिस कर्मचारी बडे याने पिस्तूल व राऊंड सोबत आणले होते. गेवराईत आल्यावर संध्याकाळी राजेंद्र घाडगे हे घरी जात असताना बडे याने दुचाकीचा पाटलाग करत पिस्तुलातून गोळ्या झाडून घाडगे यांचा खून केला. या प्रकाराने गेवराईत चर्चेला उधाण आले होते. राजकीय वादामुळेच हा खून घडवून आणल्याचीही चर्चा होती.
याचा तपास करण्यासाठी पोलिस निरीक्षक चंपालाल शेवगण, एपीआय भारत राऊत, एम.ए. सय्यद, संजय सेलमोहकर, जयसिंग वाघ, मनोज वाघ, गणेश दुधाळ, मोहन क्षीरसागर, विलास ठोंबरे, संजय खताळ, भास्कर केंद्रे, तुळशीराम जगताप, सय्यद जकी, कल्याण औटे, परमेश्वर सानप, अतुल कचरे, अनिल डोंगरे, पंचम वडमारे, शेख युसूफ रशिद खान यांनी विशेष प्रयत्न केले.
सापळा रचून घेतले ताब्यात
बीडच्या पोलिस पथकांनी वरळी मुंबई येथून परमेश्वर बडे पोलिस कर्मचारी, जालना जिल्ह्यातील टाका येथून नामदेव घुगे, पैठण तालुक्यातील हर्शी येथून सुनील वाघ तर गेवराई तालुक्यातील शिवाजी चौरे या सर्वांना वेगवेगळ्या वेळी सापळा रचुन ताब्यात घेतले. तपासात अन्य माहिती उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
5 महिन्यांपूर्वी कट
शिवाजी चौरे यांनी अन्य तिघांच्या मदतीने राजेंद्र घाडगे यांचा खून करण्याचा कट पाच महिन्यांपूर्वी रचला. यात परमेश्वर रावसाहेब बडे (मुंबई पोलिस कर्मचारी), नामदेव एकनाथ घुगे (रा. टाका, ता. अंबड जि. जालना), सुनील परसराम वाघ (रा. हर्शी, ता. पैठण, जि. औरंगाबाद) या सर्वांची मदत घेतली.
जलद तपासाने यश
शिक्षकाचा खून होणे हा प्रकार चुकीचा आहे. प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस पथके स्थापन केली. सर्वांनी केलेल्या जलद तपासामुळे हा प्रकार, आरोपी आणि कारणे उघडकीस आली. पुढील तपास या गुन्ह्याच्या तपास पोलिस उपअधीक्षक ज्योती क्षीरसागर या करत आहेत.’’
दत्तात्रय मंडलिक, पोलिस अधीक्षक